कमी ऊर्जेत अडथळा ओळखणार्‍या कृत्रिम चेतापेशींची निर्मिती; टोळाच्या मेंदूचे अनुकरण

कमी ऊर्जेत अडथळा ओळखणार्‍या कृत्रिम चेतापेशींची निर्मिती; टोळाच्या मेंदूचे अनुकरण

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : टोळाच्या मेंदूचे अनुकरण करत कमी उर्जेत अडथळा ओळखू शकणार्‍या कृत्रिम चेतापेशींची निर्मिती आयआयटीतील संशोधकांनी केली आहे. हा ट्रान्झिस्टर यंत्रमानवाला कमी उर्जेसाठी वापरता येणार आहे.

कृत्रिम बुद्धिमता क्षेत्रात वेगाने प्रगती होत आहे आणि त्यातून निर्माण होणार्‍या अभिनव नवनिर्मितीचा मानवी आयुष्यावर पडणारा प्रभाव थक्क करणारा आहे. चालकविरहित स्वयंचलित वाहनांसाठी एक महत्वाचे आव्हान ठरते ते म्हणजे समोर येणारा हलता अडथळा त्वरित अचूकपणे हेरणे. यासाठी अडथळा शोधक यंत्रणा वापरल्या जातात. परंतु, सध्या वापरल्या जाणार्‍या यंत्रणा क्लिष्ट अल्गोरिदम आणि दृष्टी प्रणालीवर आधारित असून, त्यांचा ऊर्जा वापर व आकार जास्त आहे.

आयआयटी मुंबई आणि किंग्ज कॉलेज, लंडन, युनायटेड किंगडम यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या एका नव्या अभ्यासाअंतर्गत संशोधकांनी कमी ऊर्जाचलित ट्रान्झिस्टरची रचना व निर्मिती केली आहे. हा ट्रान्झिस्टर त्यांच्या कृत्रिम न्यूरॉन सर्किट रचनेमध्ये बसवल्यावर सहज अडथळा ओळखण्याचे कार्य करू शकतो.

या संशोधनासाठी विशेषतः टोळ या किटकाच्या मेंदूमधील धडक ओळखण्याचे कार्य करणार्‍या चेतापेशींचे कार्य कसे चालते यावर याचे संशोधन विचारात घेतले आहे. मेंदूची माहिती हाताळण्याच्या जलद पद्धतीवरून संशोधकांना या अभ्यासासाठी प्रेरणा मिळाली. लोब्यूला जायंट मूव्हमेंट डिटेक्टर (एलजीएमडी हालचाल ओळखणारी एक चेतापेशी) नावाच्या या चेतापेशीमुळे टोळ वाटेतील अडथळ्यांवर धडकण्यापासून स्वतःचा बचाव करू शकतो.

संगणकीय यंत्रणा मेंदूच्या या यंत्रणेच्या बरीच जवळ जाणारी असली तरी, हेच कार्य करायला संगणकाच्या तुलनेत मेंदूला बरीच कमी ऊर्जा लागते.या अभ्यासातून संशोधकांनी एक नवीन प्रकारचे, कमी उर्जेवर चालणारे कृत्रिम चेतापेशी सर्किट तयार केले. ते टोळमध्ये आढळणार्‍या या धडक ओळखण्याचे कार्य करणार्‍या चेतापेशीच्या कार्याचे अनुकरण करणारे आहे.

आयआयटीतील विद्युत अभियांत्रिकी विभागातील प्रा. सौरभ लोढा यांनी या संदर्भात सांगितले की,माहिती साठवणे या कामासाठीच आधुनिक संगणक खूप जास्त ऊर्जा वापरतात, परंतु, मानवी मेंदू हेच कार्य अत्यल्प उर्जेत करतो. त्यामुळे, न्यूरोमॉर्फिक इलेक्ट्रॉनिक्ससाठी (जैव-प्रेरित; मानवी मेंदूच्या कार्याचे अनुकरण करणारी संरचना असलेले) कमी ऊर्जावापर करणे हे आता गरजेचे आहे. यामुळे कृत्रिम चेतापेशी सर्किटमध्ये नव्या ट्रान्झिस्टरचे मॉडेल बसवून त्याच्या सिम्यूलेशनद्वारे संशोधकांनी ऊर्जेची गरज अत्यल्प असल्याचे प्रात्यक्षिक दाखवत हे यशस्वी झाल्याचे ते म्हणाले.

हे नवे तंत्रज्ञान बाजारात कसे आणता येईल याबाबत सांगताना प्रा. सौरभ लोढा म्हणाले, या शोधांमुळे अडथळा शोध आणि रोध या प्रक्रियेमध्ये क्रांतिकारी बदल घडू शकतात तसेच यामुळे अधिक प्रगत न्यूरोमॉर्फिक यंत्रणा निर्मितीच्या आणि त्यांच्या प्रत्यक्ष वापराच्या भविष्यातील कामाचा मार्ग अगदी सोपा झाल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कमीत कमी ऊर्जेचा वापर करून केले काम

संशोधकांना आलेल्या आव्हानाविषयी सांगताना कर्तिकेय ठाकर म्हणाले की, या चेतापेशी सर्किटला धडक सदृश इनपुट दिले असता ते समोरील संभाव्य वस्तू ओळखू शकले व धडक होण्याची शक्यता वर्तवणारा संकेत देऊ शकले. हे काम कमीत कमी उर्जेचा वापर करून केले. याशिवाय हे सर्किट समोरून येणारे अथथळे वस्तूंमध्ये फरक ओळखू शकले. स्वायत्त यंत्रमानव तंत्रज्ञान आणि वाहन चलन या क्षेत्रात या संशोधनाचा निष्कर्षाचा विशेष लाभ होऊ शकतो. अगदी कमीत कमी उर्जेवर असलेल्या स्पायकिंग न्यूरॉन सर्किटमुळे अचूकपणे अडथळा ओळखणे आता शक्य होईल, असेही ते म्हणाले.

logo
Pudhari News
pudhari.news