

मुंबई : राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे मराठवाडा, सोलापूर जिल्ह्यांसह अन्य भागांतही मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमुळे शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याचा सरकारवर दबाव आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार हेक्टरी किती मदत जाहीर करते, याबाबत उत्सुकता आहे. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार ३३ जिल्ह्यांतील ६० लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
शेतकरी मदतीच्या विषयावरून विरोधकही आक्रमक झाले आहेत. त्यांनी एकरी ५० हजार मदतीबरोबर शेतकरी कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे. विरोधकांनी आता राज्यात याबाबत सभा, बैठका आणि दौऱ्यांचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत जाहीर करणार आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आहे, अशांना अधिकची मदत दिली जाणार आहे.