

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी नव्याने चौकशी करण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. दिशाचा सामुहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
याप्रकरणी एनआयएकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी सतीश सालियन यांनी केली आहे. तसेच याप्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिका-याच्या देखरेखीखाली करण्याची मागणी याचिकेतून केली आहे. मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकल्याचा दिशाच्या वडिलांनी याचिकेतून आरोप केला आहे. त्यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवून मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडल्याचे सालियन यांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोर्या यांच्यासह मुंबई पोलीसांवर याचिकेतून आरोप करण्यात आले आहेत. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे तसेच पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी दिशाच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपांत तथ्य असल्याचा दावा सतीश सालियन यांनी याचिकेतून केला आहे.