

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या 2024-25 आर्थिक वर्षातील वार्षिक उत्पन्नात विक्रमी वाढ झाली असून ते 133 कोटींवर पोहोचले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यात 15 टक्यांनी वाढ झाली आहे. नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि भाविकांच्या उदंड प्रतिसादामुळे अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. आगामी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 154 कोटींचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे न्यासाने म्हटले आहे.
राज्यातील नवजात बालिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने ‘श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये जागतिक महिला दिनी (8 मार्च) जन्मलेल्या नवजात बालिकांच्या नावाने 10 हजार रुपयांचे ठेव (फिक्स्ड डिपॉझिट) करण्यात येणार आहे. श्री सिद्धिविनायक न्यासाच्या विश्वस्त समितीच्या बैठकीत अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘भाग्यलक्ष्मी योजना’ मंजूर करण्यात आली. ही रक्कम मुदतपूर्ती झाल्यानंतर 18 वर्षांनंतर मुलीच्या शिक्षणासाठीच वापरणे बंधनकारक असेल. हा प्रस्ताव सध्या राज्य सरकारकडे पाठवण्यात आला असून, मंजुरीनंतर लवकरच योजनेचे निकष जाहीर केले जाणार आहेत.
मंदिर न्यासाच्या उत्पन्नाचा विनियोग गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय सहाय्य, गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तके, डायलेसिस सेंटरद्वारे रुग्णांना मदत यांसारख्या समाजोपयोगी उपक्रमांसाठी केला जातो. राज्यात मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी मंदिर न्यासाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीमुळे मुलींच्या शिक्षणाला दुय्यम स्थान देतात. त्यामुळे ‘भाग्यलक्ष्मी योजना’ सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरेल, असा विश्वास न्यासाच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.