

मुंबई : गतवर्षीच्या तुलनेत 25 जुलैअखेरीस संपलेल्या पंधरवड्यात कर्जवितरणात 10 टक्क्यांनी आणि बँक ठेवींमध्ये 10.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे
गतवर्षी याच कालावधीत कर्जवितरण 13.7 टक्क्यांनी आणि ठेवी 10.6 टक्क्यांनी वाढल्या होत्या, तर 11 जुलै 2025 रोजी संपलेल्या पंधरवड्यात कर्जवितरण 9.8 टक्क्यांनी आणि ठेवी 10.1 टक्क्यांनी वाढल्या होत्या. देशातील बँकांनी 25 जुलैअखेरीस 185.02 लाख कोटी रुपयांची कर्जे वितरित केली आहेत. तर ठेवी 233.50 लाख कोटी रुपये आहेत. 25 जुलै रोजी संपलेल्या पंधरवड्यात 31 हजार 979 कोटी रुपयांची कर्जे वितरित करण्यात आली असून याच कालावधीत 23 हजार 573 कोटी रुपयांच्या ठेवी वाढल्या आहेत.
कर्ज वितरण आणि बँक ठेवींमध्ये साधारणतः त्याच दराने वाढ होत आहे. सुवर्णतारण कर्जात वाढ होत असून, कॉर्पोरेट कर्जात घट होत आहे. कॉर्पोरेट कंपन्यांना कर्जरोख्यांचा मार्ग मिळाला आहे. तर, दुसरीकडे ठेवीदारांना चांगल्या परताव्याचे इतर मार्ग उपलब्ध झाले आहेत. परिणामी बँकांना सक्षम पतपुरवठ्याचा आणि ठेवी आकर्षित करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे केअर एजचे सहयोगी संचालक सौरभ भालेराव यांनी सांगितले. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये पतपुरवठ्यात 11.5 ते 12.5 टक्क्यांपर्यंत वाढ होईल, असा अंदाज विविध रेटिंग एजन्सीजने वर्तविला आहे.