Maha Summit 2025 : सर्व महापालिकांवर महायुतीचाच झेंडा फडकेल : रवींद्र चव्हाण

पुढारी न्यूजच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महासमिट - 25 मध्ये व्यक्त केला विश्वास
Maha Summit 2025
पुढारी न्यूजच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महासमिट - 25 मध्ये बोलताना भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण.pudhari photo
Published on
Updated on

पुढारी न्यूज वृत्तवाहिनीच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त वरळीच्या एनएससीआय पॅलेस हॉलमध्ये आयोजित महा समिट-25 मध्ये ‘विचार मंथन विकासाचे -स्वप्न महाराष्ट्राचे’ हे सूत्र घेेऊन दिवसभर चर्चासत्रे झाली. मान्यवरांच्या विशेष मुलाखती घेण्यात आल्या. या शिखर परिषदेसाठी चितळे बंधू, एमआयडीसी, एमएसआरडीसी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई, सिडको- शहरांचे शिल्पकार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांचे विशेष प्रायोजकत्व लाभले. दिवसभर चाललेल्या शिखर परिषदेचे हे संपादित वृत्तांकन-

मुंबई : केंद्र आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार आहे. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये विकासासाठी त्याच विचाराची सत्ता असावी, असा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीत उतरणार आहोत. त्यामुळे येणार्‍या महापालिका निवडणुकांमध्ये सर्व ठिकाणी महायुतीचाच झेंडा फडकेल, असा विश्वास भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. पुढारी न्यूजच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महासमिट - 25 मध्ये ते बोलत होते. पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी यांनी रवींद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आमच्यासाठी काही आव्हान वगैरे नाहीत असे ठामपणे सांगत रवींद्र चव्हाण म्हणाले, महायुतीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही अनुभवी नेते आहेत. त्यांना जसा प्रशासकीय अनुभव आहे, तसा त्यांना निवडणुकांचाही प्रदीर्घ अनुभव आहे. कोणीही हिट विकेट देणारे नाहीत. तिघे समंजस नेते आहेत. तिघेजण मिळून निवडणुकीची रणनीती आखतील. कोणत्या पक्षाचा महापौर होईल, यापेक्षा महायुतीचा महापौर होईल, याला आमचे प्राधान्य असेल.

ठाणे जिल्ह्यात पक्षीय वर्चस्वावरून शिवसेना आणि स्थानिक भाजप नेत्यांमध्ये सध्या धुसफूस सुरू आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह भाजपचे स्थानिक नेते स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांचे सबंध ताणले गेले आहेत, याकडे लक्ष वेधले असता रवींद्र चव्हाण म्हणाले, ठाणे जिल्हा हा स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी आणि रामभाऊ कापसे यांचा जिल्हा आहे. त्यानंतरच्या काळात भाजप-शिवसेना युतीचा काळ सुरू झाला आणि रामभाऊ कापसे यांचा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला.

ठाणे असो की पालघर असो, हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. गणेश नाईक हे आज नाही, तर आधीपासून जनता दरबार घेत आलेले आहेत. ते स्पष्ट बोलणारे नेते आहेत. जे मनात आहेत ते स्पष्टपणे बोलतात; पण ते पक्षाचा आदेश पाळणारे नेते आहेत. निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस आणि पक्ष जो निर्णय घेतील तो नाईक पाळतील, असेही चव्हाण म्हणाले.

Maha Summit 2025
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रवींद्र चव्हाण प्रथमच ‘पुढारी’च्या मंचावर आले. सन्मानचिन्ह देऊन त्यांचे स्वागत करताना ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन एमिरेटस् आणि मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन आणि समूह संपादक डॉ. योगेश जाधव.pudhari photo

शिंदेंशी मतभेद नाहीत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपल्यात कोणतेही मतभेद नाहीत. एकनाथ शिंदेंकडे चहाला काय, मी जेवायलाही जाईन. ते आणि मी अनेकवेळा एकत्र जेवलो आहोत. अगदी रस्त्यावर वडापावदेखील खाल्ला आहे. त्यांच्यात आणि माझ्यात काहीही मतभेद नाहीत. त्यांना व मला कुठे थांबायचे कळते. आम्ही दोघेही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करत आहोत, असे चव्हाण यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले.

आयारामांचा निर्णय चुकला, तर दुरुस्त करू

भाजपमध्ये सातत्याने अन्य पक्षांतील नेत्यांचे प्रवेश सुरू आहेत. नाशिक आणि अन्य ठिकाणी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांनाही पक्षात घेण्यात आले आहे. त्यामुळे भाजपाचा चेहरा बदलत चालला आहे का, असा सवाल त्यांना केला असता रवींद्र चव्हाण यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आम्ही कोणालाही पक्ष प्रवेश देताना कोअर टीममध्ये निर्णय करतो. निर्णय घेताना कधीकधी अशा लोकांना घ्यावे आणि घेऊ नये असे दोन मतप्रवाह असतात. कधी कधी घेतलेले निर्णय चुकतात; पण चुकले तर दुरुस्त करण्याची संधी असते. त्यामुळे कुठे अयोग्य झाले असेल, तर दुरुस्त करू.

सरकार सर्व जाती- धर्मांचा विचार करत आहे

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरही चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ‘सबका साथ, सबका विकास व सबका प्रयास’ ही भूमिका घेऊन आम्ही काम करत आहोत. आम्ही सर्वच समाजांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन त्यांनाही न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व समाजाचा विचार केला म्हणून लाडकी बहीण, उज्ज्वला योजना, सर्वांसाठी घरकूल अशा योजना आम्ही आखल्या. सरकार मायबाप म्हणून काम करत आहे. जातीजातीत तिढा निर्माण होऊ नये म्हणून काही गोष्टींकडे दुर्लक्षच केले पाहिजे, असे चव्हाण म्हणाले.

  • मुंबई महापालिका भाजपला, तर ठाणे महापालिका शिवसेनेला असे काही ठरले आहे का? ठाण्यात एकनाथ शिंदे यांना झुकते माप दिले जाणार आहे का, असा सवाल रवींद्र चव्हाण यांना केला असता ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मन फार मोठे आहे. ते मोठ्या आणि उदार मनाचे आहेत. ते कधी कोणाला काय देतील, हे सांगता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news