

नवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा
हिवाळ्याची चाहूल लागताच नवी मुंबईतील पाणथळ क्षेत्रांमध्ये परदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. पाम बीच मार्गावरील टी. एस. चाणक्य परिसरातील विस्तीर्ण पाणथळ जागा सध्या विविध देशांतून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांसाठी आकर्षणाचे ठिकाण बनली आहे. या परिसरात दरवर्षी हिवाळ्यात विविध प्रजातींचे पक्षी दाखल होत असल्याने पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकारांची पावले या भागाकडे वळू लागली आहेत.
यंदाच्या हंगामात या परिसरात दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या 'बायलॉन क्रेक' या पक्ष्याने पक्षीप्रेमींचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. आकाराने लहान असलेल्या या पक्ष्याचे सौंदर्य आणि त्याची वैशिष्ट्यपूर्ण ठेवण छायाचित्रकारांसाठी आकर्षण ठरत आहे. पक्षी छायाचित्रकार आणि अभ्यासक प्रदीप चौधरी यांनी या दुर्मिळ पक्ष्याला आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. त्यांनी टिपलेले छायाचित्र पक्षीप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरले असून, हा पक्षी पाहण्यासाठी आणि त्यावे छायाचित्र टिपण्यासाठी परिसरात छायाचित्रकारांची गर्दी होत आहे.
टी. एस. चाणक्य परिसरातील पाणथळ जागा स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वाचे अधिवास ठरत आहेत. हिवाळ्यात येथे विविध प्रकारचे बदक, पाण कोंबड्या, किनारपट्टीवरील पक्षी, जलपक्षी पाहायला मिळतात. त्यामुळे पक्षी निरीक्षक, निसर्गप्रेमी व वन्यजीव छायाचित्रकारांसाठी ही पर्वणी ठरत आहे. पक्ष्यांच्या हालचाली टिपण्यासाठी छायाचित्रकार येथे दाखल होत आहेत.
जैवविविधतेचे दर्शन
नवी मुंबईच्या वेगाने होणाऱ्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर टी. एस. चाणक्य परिसरातील पाणथळ जागांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. परदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या या पक्ष्यांसाठी अशा नैसर्गिक जागा सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. पक्ष्यांच्या आगमनामुळे नवी मुंबईच्या जैवविविधतेचे दर्शन घडत असून, हा निसर्गाचा अनमोल ठेवा जपण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.
बायलॉन केक हा पाणथळ जागा, दलदलीचे प्रदेश, गवताळ भाग आणि पाणवनस्पतींनी व्यापलेल्या परिसरात वावरणारा लहान आकाराचा जलपक्षी आहे. त्याचे राखाडी रंगाचे शरीर, तपकिरी पंखांवरील ठिपके, लालसर डोळे आणि हिरवट चोच ही त्याची प्रमुख ओळख आहे. हा पक्षी प्रामुख्याने युरेशियातील काही भागांत प्रजनन करतो आणि हिवाळ्यात भारतासह उबदार प्रदेशांकडे स्थलांतर करतो.