

मुंबई : भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकने रॅपिडो बाइक टॅक्सीला धडक दिल्याने शुभांगी सुरेंद्र मगरे या ४९ वर्षीय प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश विश्राम माधव हा २५ वर्षीय रॅपिडोचालक जखमी झाला. याप्रकरणी नवघर पोलिसांनी अपघाताची नोंद करून मिक्सर ट्रकचालक जवाहीर बंशराज यादव (४०) याला अटक केली आहे. हा अपघात शनिवारी सकाळी अकरा वाजता मुलुंडमधील पूर्व दुतग्रती महामार्गावरील ऐरोली फ्लायओव्हर ब्रिजखालील ऐरोली जंक्शनजवळ झाला.
शुभांगी या मलुंडमध्ये राहत असून माटुंगा येथे कामाला होत्या. शनिवारी त्यांनी रॅपिडो बाइक टॅक्सी बुक केली होती. गणेश माधव या बाइक टॅक्सी चालकासोबत त्या कामाच्या दिशेने जात होत्या. सकाळी अकरा वाजता ऐरोली जंक्शनजवळ भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात ते दोघेही जखमी झाले होते.
त्यामुळे या दोघांनाही स्थानिक रहिवाशांसह वाहतूक पोलिसांनी जवळच्या मुलुंडच्या फोर्टीज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे डॉक्टरांनी शुभांगी यांना मृत घोषित केले, तर गणेशची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताला जबाबदार असलेल्या जवाहीर यादव याला नवघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून सध्या नवी मुंबईत राहत असल्याचे नवघर पोलिसांनी सांगितले.