

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेने राजकीय अटकळी बांधल्या जात आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना झालेली ही भेट महत्वाची मानली जात आहे. दाेंन्ही नेत्यांमधील भेटीत झालेली चर्चा मनपा निवडणुकीआधी युतीच्या चर्चेचा विषय बनली आहे. मात्र यापैकी कोणत्याही पक्षाने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर भाष्य केलेले नाही. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात ही भेट महत्वाची मानली जात आहे.
काल (रविवार) मुंबईतील अंधेरी मध्ये एका लग्न समारंभात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले होते. यावेळी या दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेते एकमेकांशी स्मीत हास्य करत बोलत असल्याचे चित्र दिसून आले. यावेळचे फोटोही सर्वत्र व्हायरल झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीच्या चर्चेला उधाण आले आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये गेल्या बऱ्याच वर्षांपासून राजकीय दुरावा निर्माण झालेला आहे. गेल्या दोन महिन्यांत या दोघांमधली ही सलग दुसरी भेट झाली आहे. ज्यावरून असा अंदाज लावण्यात येत आहे की, हे दोन्ही नेते पुन्हा एकदा एकत्र येउ शकतात.
राज ठाकरे यांनी २००५ मध्ये शिवसेनेतून बाहेर पडून २००६ मध्ये आपला नवा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) स्थापन केला होता. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत (२०२४) शिवसेना (युबीटी) ला २० जागा मिळाल्या होत्या. मात्र मनसेला एकही जागा जिंकता आली नव्हती.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. या दरम्यान युतीची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुती या दोन्हींमध्येही अंतर्गत मतभेदाच्या बातम्या येत असतात. या सर्व परिस्थितीत दोन्ही ठाकरे बंधूंची भेट होणे ही भविष्यातील नवे राजकीय समीकरण ठरू शकते.