Raj Thackeray : ‘इंस्टाग्राममधून बाहेर पडा’, राज ठाकरेंचा तरुणांच्या मानसिकतेवर प्रहार; इराणच्या मुद्द्यावरून मोदींनाही टोला

‘महाविद्यालयांच्या गेटवर ड्रग्ज मिळतंय, नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात फक्त मुंबईतील ८६ मुले बेपत्ता’
Raj Thackeray : ‘इंस्टाग्राममधून बाहेर पडा’, राज ठाकरेंचा तरुणांच्या मानसिकतेवर प्रहार; इराणच्या मुद्द्यावरून मोदींनाही टोला
Published on
Updated on

मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईचे शिवतीर्थ पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या धडाकेबाज भाषणाने आणि मनसैनिकांच्या अलोट गर्दीने दणाणून गेले. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या जंगी सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढलेच, पण त्याचसोबत दिशाहीन होत चाललेल्या महाराष्ट्राच्या तरुण पिढीला आणि जनतेला 'घरचा आहेर'ही दिला.

‘सत्ता भविष्यात हाती घेणार म्हणजे घेणारच! महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मातीसाठी आणि तुमच्यासाठी खंबीरपणे उभी आहे.’ असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुंकले.

इराणच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय राजकारणावरून टोला

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात जागतिक राजकारणातून करत केंद्र सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, ‘इराणने अनेक वर्षे भारताला साथ दिली आहे, विशेषतः जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर इराण ठामपणे भारताच्या पाठीशी उभा राहिला. मात्र, खामेनेईंच्या मृत्यूनंतर पंतप्रधान मोदींनी साधी श्रद्धांजलीही वाहिली नाही. ज्यांनी आपल्याला साथ दिली, त्यांना आपण साथ द्यायला हवी होती. या कृतघ्नतेचा त्रास भविष्यात भारताला सहन करावा लागेल.’

‘इंस्टाग्रामच्या मोहजालातून बाहेर पडा!’

जनतेच्या मानसिकतेवर प्रहार करताना राज ठाकरे अधिक आक्रमक झाले. ‘सरकारला प्रश्न विचारू नये म्हणून जाणीवपूर्वक जनतेला करमणुकीच्या गटांगळ्यांत गुंतवले जात आहे. मोबाईल आणि इंस्टाग्रामच्या जगातून बाहेर पडा! आजूबाजूला काय चाललंय याचं भान उरलं नाहीये का?’ असा संतप्त सवाल त्यांनी केला. महाराष्ट्राची अवस्था वाईट झाली असताना जनता मात्र केवळ करमणुकीत वाहून जात असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.

कर्जाच्या डोंगराखाली दबलेला महाराष्ट्र

राज्याच्या आर्थिक स्थितीवर बोलताना त्यांनी धक्कादायक आकडेवारी मांडली. ते म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण्यांचा काळ संपला तेव्हा राज्यावर २ लाख कोटींचे कर्ज होते, आज ते ११ लाख कोटींवर पोहोचले आहे. राज्यातील शहरे वाहतूक कोंडीत फसली असून पायाभूत सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. तीनवेळा कर्जमाफी होऊनही बळीराजाचा फास सुटलेला नाही.’

‘महाराष्ट्र विकायला काढलाय का?’

सत्ताधारी आणि उद्योगपतींच्या अभद्र युतीवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, ‘सगळं काही अदानींसारख्या उद्योगपतींच्या घशात घातलं जातंय. आमदारांना आणि खासदारांना फक्त पैसा दिसतोय. महाराष्ट्र स्वतःचं अस्तित्व गमावतोय आणि हे लोक राज्य विकायला काढल्यासारखे वागत आहेत. कोणतीही सुरक्षिततेची हमी नसलेल्या राज्यात आपण राहतोय का?’

ड्रग्जचा विळखा आणि गायब होणारी मुले

भाषणात अत्यंत गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधून, ‘महाराष्ट्रातील तरुण पिढी ड्रग्जच्या आहारी गेली आहे. महाविद्यालयांच्या गेटवर ड्रग्ज मिळतंय. पोलीस काय करतायत? गेल्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात फक्त मुंबईतील ८६ मुले बेपत्ता झाली आहेत, ही धोक्याची घंटा आहे,’ असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news