

MNS Anti Hindi March Mumbai
हिंदी किंवा अन्य कोणत्याही भाषेची सक्ती आम्ही होवू देणार नाही, असे स्पष्ट करत ६ जुलै रोजी गिरगाव चौपाटीपासून मोर्चा काढणार असल्याची घोषणा आज (दि.२६) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली होती. मात्र, आषाढी एकादशी रविवारी (दि.६) असल्याने मोर्चाची तारीख बदलण्यात आली आहे. आता हा मोर्चा शनिवारी (दि.५ जुलै) सकाळी १० वाजता काढण्यात येणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी एक्सवरून दिली आहे.
ठाकरे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज सकाळी आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी येत्या ६ जुलैला मोर्चाची घोषणा केली होती. त्यात थोडा बदल केला आहे, हा मोर्चा रविवारी ६ जुलै ऐवजी, ५ जुलै शनिवारी सकाळी १० वाजता काढण्यात येणार आहे. बाकी ठिकाण आणि इतर सर्व तपशील तसेच असणार आहेत. त्यामुळे माध्यमांनी आणि महाराष्ट्रातील जनतेनी या बदलाची नोंद घ्यावी.
राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा ही तिसर्या पर्यायी भाषा म्हणून शिकवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मनसेसह विविध राजकीय पक्ष व संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. मुद्द्यावर मनसेने आक्रमक भूमिका घेत थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. राज्यभरातून या निर्णयाविरोधात संताप व्यक्त होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संबंधित तज्ज्ञांशी सल्लामसलत करूनच पुढील निर्णय घ्यावेत, अशा सूचना दिल्या होत्या.यावर आज शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज राज ठाकरेंची भेट घेत त्रिभाषा सूत्रीवरती सरकारची भूमिका मांडली. दोघांमध्ये सुमारे अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली.
दरम्यान, भुसेंबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सरकारची हिंदीबाबतची भूमिका आम्हाला मान्य नाही. हिंदी सक्तीला आमचा पूर्णपणे विरोध आहे. हिंदी किंवा अन्य कोणत्याही भाषेची सक्ती आम्ही होवू देणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी दिला.