

पुढारी ऑनलाईन डेस्क :
शिराळा न्यायालयात सुरु असलेल्या एका 16 वर्षे जुन्या प्रकरणामध्ये सबळ पुराव्या अभावी मनसेचे राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. हे प्रकरण 2008 सालचे एका आंदोलनाचे होते. परप्रांतीयांच्या रेल्वे भरती प्रकरणी शेडगेवाडी फाट्यावर हे आंदोलन झाले होते. राज ठाकरे यांच्यासह दहा जणांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की रेल्वेमध्ये परप्रांतीयांची भरती केली जात असल्या प्रकरणी 2008 मध्ये राज ठाकरे यांनी मुंबईत आंदोलन केलं होतं. यावेळी राज ठाकरे यांना कल्याण मध्ये अटक करण्यात आली होती. या निषेधार्थ मनसेनं राज्यभरामध्ये आंदोलन केलं होतं. सांगलीचे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वात शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी फाटा या ठिकाणीसुद्धा आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी तानाजी सावंत यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली होती. तसेच राज ठाकरे यांना 9 क्रमांकाचा तर शिरीष पालकर यांना 10 क्रमाकांचा आरोपी करण्यात आलं होतं. हा दावा शिराळा न्यायालयात तब्बल 16 वर्षे चालला. परंतु पुराव्या अभावी राज ठाकरे यांच्यासह दहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.