rain in maharashtra : दु:खाची दरड कोसळली; राज्यात १२९ जणांचा दरड कोसळून मृत्यू

rain in maharashtra : दु:खाची दरड कोसळली; राज्यात १२९ जणांचा दरड कोसळून मृत्यू
Published on
Updated on

महापुराच्या प्रचंड वेढ्यात सापडलेला महाड, चिपळूण आणि खेड भाग गुरुवारी रात्रीपासून दरडींच्या दहशतीखाली असून, महाडमधील तळये गावात 32 घरांवर दरड कोसळली. त्यात 38 ग्रामस्थांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुसर्‍या बाजूला पोलादपूर तालुक्यात गोवेले येथे भूस्खलन होऊन 17 जण दरडीखाली गाडले गेले. त्यात त्यांचा करुण अंत झाला. या दुर्घटनेत 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या 48 तासांत राज्यात दरड कोसळून 129 जणांना प्राणास मुकावे लागले आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली.
मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून 2 लाख, तर राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, महाडमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नौदलाची दोन हेलिकॉप्टर्स, तर चिपळूणसाठी 3 हेलिकॉप्टर्स मदतकार्यासाठी पुढे सरसावली आहेत. आतापर्यंत 1 हजारपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. बुधवारी रात्रीपासून कोकणात सर्वत्र भयंकर पूरस्थिती निर्माण झाली. यामध्ये सर्वाधिक पुराचे संकट महाड आणि चिपळूण शहरांसमोर राहिले. या दोन्ही शहरांत जवळपास 10 हजार नागरिक पुरात अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढण्याचे काम गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस सुरू होते. त्यासाठी 'एनडीआरएफ'च्या 10 टीम आणि नौदलाच्या 5 हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून मदत आणि बचावकार्य सुरू होते.

दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री महाड तालुक्यातील तळये येथे दरड कोसळून अख्खे गाव दरडीखाली अडकले. महाडपासून 15 कि.मी. अंतरावर हे गाव आहे. त्यातच गावाला पुरावा वेढा असल्याने गावापर्यंत पोहोचण्यासाठी 'एनडीआरएफ' पथकालाही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. येथे मदतकार्य पोहोचायला तब्बल 8 तासांचा काळ गेला. दरम्यानच्या काळात 38 जणांचा दरडीखाली मृत्यू झाला. 15 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. दरडीखाली आणखी लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. 12 स्थानिक रेस्क्यू टीम, 'एनडीआरएफ'ची 3 पथके, कोस्टल गार्डची दोन पथके, नौदलाची 2 हेलिकॉप्टर्स मदतकार्यात आहेत.

पोलादपुरातही भूस्खलन; 17 बळी

तळये गावच्या दुर्घटनेचा बसलेला हादरा सर्वांनाच दु:खाच्या छायेत लोटणारा असताना पोलादपुरातील केवनाळे, गोवेले येथे भूस्खलन होऊन यात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. 8 ते 10 घरांवर दरडी कोसळल्या. यामध्ये केवनाळे येथे 6 जणांचा, तर गोवेले सुतारवाडीत 5 जणांचा मृत्यू झाला. कापडे बुद्रुक ग्रामपंचायतजवळील पूलही या अतिवृष्टीत वाहून गेला. या दुर्घटनेतील जखमींवर पोलादपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोन हजार वस्त्यांच्या स्थलांतराचे आदेश

कोकणात एकूण रत्नागिरी, खेड, चिपळूण, महाड या भागात दरडी कोसळल्या आहेत. तळये दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील जवळपास डोंगरपाड्यातील दोन हजार वस्त्यांच्या स्थलांतराचे आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news