मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावल्यानंतर पाऊस गायब झाला आहे. गेल्या पाच दिवसांत सातही तलावांतील पाणीसाठा अवघा ३ टक्क्याने वाढला. आता पाणीसाठा ७२ टक्क्यांवरून ७५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
९ जुलैला सात तलावांमध्ये १० लाख ५० हजार ९१२ दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. १४ जुलैला पाणीसाठा १० लाख ९६ हजार ९५२ दशलक्ष लिटर्सवर पोहोचला. म्हणजेच या पाच दिवसांत पाणीसाठ्यात अवघी ४६ हजार दशलक्ष लिटर्स इतकी वाढ झाली.
शहराला दररोज सर्वाधिक १८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावात मात्र गेल्या पाच दिवसांत तब्बल ३० हजार दशलक्ष लिटर्सने पाणीसाठा वाढला आहे. या तलावातील पाणीसाठा ४ लाख ७७हजार दशलक्ष लिटर्सवर पोहोचला आहे.
सात तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. हे तलाव भरण्यासाठी ३ लाख ५० हजार दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. दोन वर्षांच्या तुलनेत यंदा तलावातील साठा ४६ टक्क्याने जास्त आहे.