

मुंबई : राज्यात मान्सून जोरदार सक्रिय झाला असून तो मुंबई, पुणे, अहिल्यानगर भागातून शनिवारी (दि. १४) पुढे सरकण्याची शक्यता आहे. मुंबई, रायगडला शनिवारी, तर सिंधुदुर्गला रविवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे.
कोकणात १४ ते १९, मध्य महाराष्ट्रात १४ व १५, मराठवाड्यात १७ जून तर विदर्भात १६ ते १९ जून रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी रात्री राज्यातील बहुतांश भागांत चांगला पाऊस झाला, तर शुक्रवारीही सकाळी आणि सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. राज्याच्या विविध भागांत विविध प्रकारचे अलर्ट दिले आहेत. यात कोकण भागाला १४ ते १९ पर्यंत 'अति मुसळधार' पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत शनिवारी ५० ते ६० प्रतितास किलोमीटरच्या वेगाने वारे वाहतील आणि मुसळधार पाऊस पडेल, असे मुंबई विभागाच्या हवामान तज्ज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले. पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसासाठी अनुकूल असे वातावरण राहील. त्याचबरोबर विजांचा कडकडाट आणि वादळसदृश स्थिती उद् भवण्याची शक्यता असल्याचे सुषमा नायर यांनी सांगितले.