मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबई फेरीवाला समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात काही ठिकाणी उद्यानाखाली भुयारी फेरीवाला कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे.
या पर्यायी जागेत प्राधान्याने स्टेशन लगतच्या अधिकृत फेरीवाल्यांना हलवण्यात येणार असल्यामुळे रेल्वे स्टेशन परिसर येत्या वर्षभरात फेरीवालामुक्त होणार आहे. मुंबई शहर व उपनगरात वाढत्या फेरीवाल्यांमुळे पालिकेचीच नाही तर मुंबईकरांची डोकेदुखीही वाढली आहे.
पदपथ रस्त्यालगत फेरीवाल्यांची संख्या वाढल्यामुळे नागरिकांना चालताही येत नाही. याचा सर्वाधिक त्रास रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागत आहे. दादर रेल्वे स्टेशनमधून पश्चिमेला बाहेर पडणे म्हणजे तारेवरची कसरतच समजली जाते. संपूर्ण दादर रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाल्यांनी व्यापून गेला आहे.
रेल्वे स्टेशन पासून १५० मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना बसल्यास मनाई असतानाही अगदी रेल्वे स्टेशनला खेटूनही फेरीवाले बसलेले दिसून येतात. त्यामुळे लवकरच फेरीवाला झोन निश्चित करून व अन्य पर्यायी जागा उपलब्ध करून रेल्वे स्टेशन परिसरातील फेलीवाल्यांना त्या जागेत हलवण्यात येणार आहे.
मुंबई फेरीवाला समितीमध्ये अलीकडेच काही फेरीवाल्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच फेरीवाला क्षेत्र व ना फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्यात येणार आहे. फेरीवाला क्षेत्र घोषित झाल्यानंतर प्राधान्याने रेल्वे स्टेशन परिसरातील अधिकृत फेरीवाल्यांना त्या क्षेत्रात हलवण्यात येणार आहे. त्याशिवाय मुंबई महानगरपालिकेने काही रेल्वे स्टेशन परिसरापासून जवळच उद्यानाखाली फेरीवाला कॉम्प्लेक्स तयार करून त्या ठिकाणी फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
अंधेरी नवरंग सिनेमासमोर असलेल्या उद्यानाखाली फेरीवाला कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी विधानसभा निवडणुकीनंतर निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याच धर्तीवर अन्य उद्यानांचा अभ्यास करून त्याखाली फेरीवाला कॉम्प्लेक्स उपरता येईल की नाही, याचा अभ्यासही करण्यात येणार आहे.
मुंबईत सरासरी ३४ हजार अधिकृत फेरीवाले असले तरी यात अजून १५ ते २० हजार फेरीवाल्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार फेरीवाल्यांचे क्षेत्र निश्चित करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.