मुंबई : गणेश चतुर्थीच्या भव्य उत्सवाचा समारोप शनिवारी अनंत चतुर्दशीला विसर्जनाने होत असताना, मुंबई वाहतूक पोलिसांनी गर्दी आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन केले आहे. वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून अनेक मार्गांवर जड आणि हलक्या वाहनांवर निर्बंध घालण्यात आले आहेत, तर अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे.
मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये वाहतूक व्यवस्थापनासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत. चेंबूर, चुनाभट्टी, ट्रॉम्बे, मानखुर्द, मुलुंड, साकीनाका, कांदिवली, गोरेगाव, सांताक्रूझ आणि डीएन नगर येथील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी आहे. हेमू कलानी मार्ग, गिडवानी मार्ग, सायन-पनवेल महामार्ग, एलबीएस रोड, जेव्हीएलआर आणि मढ-मार्वे रोडवरही निर्बंध लागू आहेत.
मुंबईत देवडे रोड, जुहू तारा रोड आणि ओशिवरा नाला परिसरातील रस्ते पूर्णपणे बंद राहतील. अनेक ठिकाणी नो-पार्किंग झोन जाहीर करण्यात आले आहेत. धोकादायक रेल्वे ओव्हरब्रिजवर 100 हून अधिक लोकांना एकत्र येण्यास, मिरवणुका थांबवण्यास किंवा लाऊडस्पीकर वापरण्यास मनाई आहे.
6 सप्टेंबर रोजी स्वराज्य भुमी गिरगाव चौपाटी या ठिकाणी भायखळा, नागपाडा, काळबादेवी, डी. बी. मार्ग वाहतूक विभागातून लालबाग राजा व इतर मोठ्या गणपती मूर्तींचे विसर्जन केले जाते. या अनुषंगाने दक्षिण वाहतूक विभागांतर्गत वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले आहेत.
वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला दुपारी 12.00 वा. ते दुसर्या दिवशी पहाटे 6 वाजेपर्यंत महत्वाचे रस्ते बंद राहणार आहेत. या काळात होणारी गैरसोय टाळण्याकरीता नागरिकांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दिवशी तिनही मार्गांवर लोकल ट्रेन रात्रभर चालू राहणार आहेत.
विसर्जनाची मुख्य ठिकाणे
मुंबई शहरात गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, मालाड मालवणी टी जंक्शन, पवई (गणेश घाट) या ठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.
अवजड वाहनांना प्रवेश बंदी
गणेश विसर्जन असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून संपूर्ण बृहन्मुंबई परिसरात 6 सप्टेंबर रोजी सकाळी 7 पासून ते 7 सप्टेंबर मध्यरात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. या काळात उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईत येणार्या तसेच दक्षिण मुंबईतून उत्तर मुंबईमध्ये जाणार्या वाहनचालकांनी कोस्टल रोडचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कुलाबा विभागातील बंद रस्ते
नाथालाल पारेख मार्ग : भाई बंदरकर चौक (बधवार पार्क जंक्शन) ते सय्यद मोहम्मद जमादार चौक (इंदु क्लिनिक जंक्शन) पर्यंतचा मार्ग वाहतुकीकरीतादोन्ही वाहिन्यांवर बंद राहील.
पर्यायी मार्ग : भाई बंदरकर चौक (बधवार पार्क जंक्शन) ते सय्यद मोहम्मद जमादार चौक (इंदु क्लिनिक जंक्शन) कडे न जाता सदरची वाहतुक कॅ. प्रकाश पेठे मार्गाने झुलेलाल मंदिर चौक (पांडे लेनजंक्शन) पासून पुढे इच्छित स्थळी जातील.
कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग : संत गाडगे महाराज चौक (धनपाल नाका) ते झुलेलाल मंदिर चौकपर्यंत (पांडे लेन जंक्शन) उत्तर वाहिनी वाहतुकीकरीता बंद राहील.
पर्यायी मार्ग :- संत गाडगे महाराज चौक (धनपाल नाका) ते झुलेलाल मंदिर चौक (पांडे लेन जंक्शन)कडे न जाता सदरची वाहतुक साधु टि.एल.वासवानी मार्गाने वर्ल्ड ट्रेड सेंटर, उजवे वळण मेकर टॉवर उजवे वळण जी. डी. सोमानी मार्गाने झुलेलाल मंदिर चौक (पांडे लेन जंक्शन) पासून पुढे इच्छित स्थळी जातील..
मरिन ड्राईव्ह विभागातील बंद रस्ते
नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग : नेताजी सुभाषचंद्रबोस मार्ग उत्तर संभाजी वाहिनी मार्गावरील सागरी वाहतूक आवश्यकतेनुसार इस्लाम जिमखानापासून छत्रपती मार्ग कोस्टल रोड मार्गे वळविण्यात येईल.
आझाद मैदान विभागातील बंद असलेले रस्ते
महानगरपालिका मार्ग ः सी. एस. एम. टी. जंक्शन ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) पर्यंत वाहतूक आवश्यकतेनुसार प्रतिबंधित असेल.
पर्यायी मार्ग : 6 सप्टेंबर रोजी येथील वाहतूक सी.एस. एम. टी. जंक्शन वरून डी. एन. रोड एल. टी. मार्गे ते मेट्रो जंक्शन (वासुदेव बळवंत फडके चौक) अशी वळविण्यात येणार आहे.
काळबादेवी विभागातील बंद रस्तेे
जे. एस. एस. रोड : संगीतकार अब्दुल करीम खान चौक (अल्फ्रेड जंक्शन) ते समतानंद अनंत हरी गद्रे चौक (पोर्तुगीज चर्च) हा रस्ता गरजेनुसार वाहतुकीस बंद राहील.
पर्यायी मार्ग : वाहतूक महर्षी कर्वे मार्ग व एन. एस. रोड मार्गे वळविण्यात येईल.
विठ्ठलभाई पटेल मार्ग : कस्तुरबा गांधी चौक (सी पी टँक सर्कल) ते भगवान श्री चंद्रप्रभा चौक (हॉटेल नित्यानंद जंक्शन) हा रस्ता वाहतुकीस बंद राहील.
पर्यायी मार्ग : वाहतूक काळबादेवी रोड व महर्षी कर्वे मार्गने वळविण्यात येईल.
बाबासाहेब जयकर मार्ग : डॉ. चंद्रकला हाटेबाई चौक (घोडागाडी जंक्शन) ते डॉ. यशवंत सामंत चौक (खत्तर गल्ली नाका) दरम्यानची वाहतूक अनंत चतुर्थी दिवशी बंद राहील.
पर्यायी मार्ग : वाहतूक काळबादेवी रोड व महर्षी कर्वे मार्गने वळविण्यात येईल.
राजा राम मोहन रॉय रोड : चारुशीला गुप्ते चौक (चन रोड स्टेशन जंक्शन) ते पद्मश्री गोवर्धन बाप्पा चौक (प्रार्थना समाज जंक्शन) हा रस्ता गरजेनुसार वाहतुकीस बंद राहील.
पर्यायी मार्ग : वाहतूक महर्षी कर्वे मार्गने वळविण्यात येईल.