

अनिकेत मोहित
श्रीवर्धन: रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, रोहा, पोलादपूरसह म्हसळा तालुक्यात सोमवारी अवकाळी पाऊस झाला. अवेळी माघार घेतलेल्या पावसाने आता शेतात भात कापणी झालेली असताना हजेरी लावली आहे.
या पावसाने पोलादपूर, श्रीवर्धन आणि रोहा तालुक्यात शेतात कापून ठेवलेले भात भिजेल आहे. हातातोंडाशी आलेले भातपिक भिजल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आता परतीच्या पावसाचे नवे संकट उभे राहिले आहे. काबाडकष्ट करून पिकवलेले भातपीक कापणी करून शेतात वाळत घातले असतानाच परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कापणी केलेले भातपीक पावसाच्या पाण्यात भिजल्याने त्याचा दर्जा खालावण्याची तसेच उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यंदा श्रीवर्धन तालुक्यात पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका भातशेतीला बसला. भातलावणीच्या सुरुवातीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांना पिकाच्या वाढीबाबत चिंता लागून राहिली होती.
त्यातच भातपीक तयार होण्याच्या टप्प्यात रानडुकरांनी शेतात घुसून पिकांचे नुकसान केले. या संकटांवर मात करत शेतकऱ्यांनी भातपीक कापणीला सुरुवात केली होती. मात्र, कापणी केलेले भात शेतात वाळवण्यासाठी ठेवले असतानाच परतीच्या पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.
कापणी केलेल्या भाताच्या पेंढ्या आणि सुट्या लोंब्या पावसात भिजल्याने धान्याला ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे भात काळवंडणे, दाण्यांची प्रतवारी खराब होणे आणि साठवणुकीदरम्यान नुकसान होण्याची शक्यता आहे.
आधीच कमी उत्पादनामुळे आर्थिक गणित बिघडलेल्या शेतकऱ्यांना आता या नुकसानीचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे. लागणारा वाढता खर्च, मजुरीचे दर, बियाणे आणि खतांचा खर्च यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहेत.
वर्षभराच्या मेहनतीनंतर हाती येणाऱ्या भातपिकातून कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि पुढील हंगामाचे नियोजन केले जाते. मात्र, निसर्गाच्या बदलत्या लहरींमुळे शेतकऱ्यांचे हे आर्थिक गणित कोलमडत आहे.
दरम्यान, परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेतीची कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळावी, अशीही मागणी होत आहे.
रोहा तालुक्यात पहाटेच्या मुसळधार पावसाने हाहाकार
रोहा तालुक्यात शेतात कापून ठेवलेल्या धानात पाणीच पाणी झाल्यामुळे शेतकऱ्यांना अधिकच नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शनिवारपासून दोन दिवस ढगाळ वातावरण व जाणवत असलेली कमालीची उष्णता अशा परिस्थितीत कोणत्याही वेळी पाऊस कोसळेल असा अंदाज बांधला होता व त्याची प्रचिती सोमवारी पहाटेच्या सुमारास आली.
शेताची कामे उरकताना शेतकऱ्यांसमोर अडचणी
म्हसळा : ऑक्टोबर महिन्यातील कडक उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना अवेळी पावसाच्या शिरकाव्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. यंदा पावसाचे प्रमाण फारच कमी राहिल्याने म्हसळा तालुक्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.विशेषतः भातशेतीच्या हंगामात पावसाने ओढ दिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात भातपीकच आले नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
अशा अवेळी पावसामुळे किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल या आशेने नागरिकांकडून पावसाचे स्वागत होत आहे. यंदा कडक उन्हामुळे शेतातील कामे उरकताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.