

मुंबई : टाटा मेमोरिअल सेंटर एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्राच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील तांबाटी (ता. खालापूर) येथे 100 खाटांचे रुग्णालय उभारणार आहे. या रुग्णालयासाठी दिलेल्या 10 हेक्टर जमिनीच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
राज्य सरकारने 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी तांबाटी येथील दहा हेक्टर जमीन एक रूपया प्रतिवर्षी या नाममात्र दराने दिली आहे. या जमिनीच्या करारनाम्यावरील मुद्रांक शुल्कात सवलत मिळावी, अशी विनंती टाटा मेमोरिअल संस्थेने केली होती. त्यानुसार मंत्रिमंडळाने आज हा निर्णय घेतला. या रुग्णालयामुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागासह लगतच्या शहरातील नागरिकांना कर्करोग संदर्भातील उपचार आणि आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
रुग्णालयातील 100 खाटांपैकी 12 टक्के खाटा समाजातील गरीब, दारिद्र्यरेषेखालील कुटुंब, शासकीय कर्मचारी या गटातील रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात. तसेच शासकीय योजनेनुसार कर्करोगावर सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून द्यावेत. रुग्णासोबतच्या एका व्यक्तीस अत्यल्प दरामध्ये रहिवासी सेवा उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा अटींसह या रुग्णालयाला मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे.