

मुंबई ः उद्धव ठाकरे गटाचे पंधरा आमदार आणि काँग्रेसचे दहा आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे राज्यात येत्या गुरुवारी मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. सोबतच, त्यांनी केंद्रातही मोठा भूकंप होणार असल्याचे सांगितले.
येत्या 23 रोजी शिंदे गटाचा मेळावा मुंबईत होणार असून, त्याविषयी शेवाळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यावेळी ते म्हणाले, 23 जानेवारीला मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यासंबंधीच्या घडामोडी सुरू आहेत. याची कुणकुण लागल्यामुळे काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे शिवसेनेवर बिनबुडाचे आरोप करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात मतभेद असल्याची आवई या दोघांनी त्यासाठीच उठवली आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 7 खासदार निवडून आले आणि विधानसभेला 57 आमदार निवडून आले. विधानसभा निवडणुकीत ‘उबाठा’ गटापेक्षा आम्हाला 15 लाख मते अधिक मिळाली. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची? याचे उत्तर मिळाले आहे. येत्या 23 तारखेला बाळासाहेबांची जयंती आहे. त्या दिवशी हा आमचा विजय आम्ही बाळासाहेब ठाकरे यांना समर्पित करणार आहोत, असेही शेवाळे यांनी स्पष्ट केले.