

मुंबई : भाजपचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा असतानाच विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो. त्यामुळे पक्ष मला जी जबाबदारी देईल ती मी पार पाडणार. मी विधानसभा अध्यक्ष, मंत्री किंवा आमदार असलो तरी शेवटी मला जनतेसाठीच काम करायचे आहे, असेही ते म्हणाले.
नार्वेकर यांनी शुक्रवारी काळबादेवी ते गिरगावदरम्यान मेट्रोची, तसेच तेथील मार्गाची पाहणी केली. त्यावेळी ते म्हणाले, मला कोणती जबाबदारी द्यायची याचा निर्णय पक्ष घेईल. मी ऐकीव बातमीवर विश्वास ठेवत नाही. पक्षाची जी इच्छा असेल ती माझी इच्छा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभेच्या अध्यक्षपदावर राहून मी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. अध्यक्ष म्हणून मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. मी संतुष्ट आहे, असे नार्वेकर म्हणाले. मंत्री झालात तर आपल्याला आनंद होईल काय, असे विचारताच ते म्हणाले, मंत्र्यापेक्षा अध्यक्ष हे वरचे पद आहे. त्यामुळे मंत्री झालो तर आनंद कसा होईल, असा प्रतिसवाल त्यांनी केला.
मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्य सरकार अडचणीत आले असतानाच आठ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र, अशा मंत्र्यांची अध्यक्ष नार्वेकर यांनी पाठराखण केली. कोणालाही डच्चू दिला जात नाही. कदाचित पक्षाला अनेकांना संधी द्यायची असेल. त्यामुळे पक्षाचा जो निर्णय असेल तो सर्वांना मान्य असेल, असे ते म्हणाले.