

मुंबई : नमिता धुरी
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वांद्रे येथील मुख्यालयात येणार्या अभ्यागतांचा प्रवेश सुलभ व्हावा व त्यांची तपशीलवार नोंद व्हावी, यासाठी प्रवेश प्रक्रियेसाठी डिजिटल यंत्रणेचा आधार घेण्यात येत आहे. 2 कोटी 73 लाखांचे कंत्राट देऊन अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यात आली आहे; मात्र तरीही प्रवेशद्वारावर लागणार्या लांबलचक रांगेत अभ्यागतांना ताटकळत उभे राहावे लागत आहे.
पूर्वी म्हाडा मुख्यालयात प्रवेश करताना तेथील सुरक्षारक्षक नोंदवहीमध्ये अभ्यागतांचे नाव, संपर्क क्रमांक व त्यांना कोठे जायचे आहे याची माहिती लिहून घेत असत. त्यानंतर प्रवेश यंत्रणा डिजिटल करण्यासाठी प्रोबिटी कंपनीला 2 कोटी 73 लाखांचे कंत्राट 1 वर्षासाठी देण्यात आले. आता कंपनीचे काही कर्मचारी आणि सुरक्षारक्षक टॅबमध्ये सर्व माहिती नोंदवून घेतात. एकच व्यक्ती पुन्हा आल्यास केवळ संपर्क क्रमांक नोंदवल्यास सर्व माहिती स्क्रीनवर दिसते. नोंद झाल्यानंतर अभ्यागतांनी आपला चेहरा स्क्रीनसमोर दाखवल्यावरच दरवाजा उघडतो व त्यांना आत जाता येते.
काही दिवसांपूर्वी प्रवेशद्वाराच्या बाहेर क्यूआर कोड लावण्यात आले होते. हा कोड स्कॅन केल्यास डिजिटल प्रवेशिका तयार होते. त्याआधारे लगेच प्रवेश मिळतो; मात्र आता ते कोड काढून टाकण्यात आले आहेत. एके ठिकाणी लावलेला कोड स्कॅन होत नाही. त्यामुळे अभ्यागतांना रांगेत उभे राहण्याशिवाय पर्याय नाही. कार्यालयात नियमितपणे येणार्या अभ्यागतांनाही प्रत्येकवेळी रांगेत उभे राहून नोंद करूनच आत जावे लागते. अधिकार्यांची वेळ घेण्यासाठी संकेतस्थळावर ऑनलाइन यंत्रणा आहे; मात्र त्याबाबत अभ्यागतांमध्ये जागरूकता नाही. सुरक्षारक्षकही त्याबाबत माहिती देत नाहीत. त्यामुळे प्रवेशद्वारावर रोज गर्दी होते आहे.
वकील, पत्रकार यांचे म्हाडा मुख्यालयात नियमितपणे येणे-जाणे असते. तसेच काही सर्वसामान्य नागरिकांनाही एकाच कामासाठी पुन्हा-पुन्हा यावे लागते. अशा वेळी त्यांची नोंद आधीच म्हाडाकडे असूनही केवळ चेहरा स्कॅन करून प्रवेश मिळत नाही. रांगेत उभे राहून संपर्क क्रमांक व कुठे जाणार हे सांगून मगच प्रवेश मिळतो. त्यामुळे वकील, पत्रकार यांची आणखी एक रांग लागते. असे दीड ते दोन हजार अभ्यागत रोज म्हाडामध्ये येतात.
अभ्यागत कोणत्या विभागात कोणाला भेटायला जाणार आहेत याची नोंद करावीच लागेल. रस्त्यावर रांग लागू नये म्हणून लवकरच त्यात बदल करण्यात येणार आहेत. प्रवेशद्वाराजवळ 10 खिडक्या तयार केल्या जातील. ज्येष्ठ नागरिक, अपंग, वकील यांच्यासाठी वेगवेगळ्या रांगा केल्या जातील. त्यामुळे रस्त्यावर रांग लागणार नाही. नागरी सुविधा केंद्राला रोज 200 ते अडीचशे लोक भेट देतात. त्यांची कागदपत्रे तेथे जमा करून घेतली जात असल्यामुळे त्यांना आतमध्ये यावे लागत नाही. अधिकार्यांना भेटायचे असल्यास अभ्यागतांनी संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन वेळ घ्यावी. यामुळे त्यांना रांगेत थांबावे लागणार नाही.
सविता बोडके, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी, म्हाडा
वकील, ज्येष्ठ नागरिक यांची वेगवेगळी रांग करायला हवी. आम्हाला सुनावणीसाठी जायचे असल्यास रांगेत उभे राहण्यात वेळ जातो. माझ्या संपर्क क्रमांकाची नोंद आधीच आहे. त्यामुळे केवळ फेस रीडींग करून प्रवेश मिळाला पाहिजे.
अॅड. सीमा शिंदे