Dr. Smita Yogesh Jadhav : पुणे पदवीधरमधून डॉ. स्मिता योगेश जाधव यांना भाजपची उमेदवारी जाहीर

Pune Graduate Constituency Election : शिक्षण, माध्‍यम आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदानाची दखल
Dr. Smita Yogesh Jadhav Pune Graduate Constituency Election
डॉ. स्मिता योगेश जाधव.Pudhari News
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली / मुंबई : ‘पुढारी’ माध्यम समूहाच्या संचालिका आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (पिंपरी) पुणेच्या प्र-कुलगुरू डॉ. स्मितादेवी योगेश जाधव यांना भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली. त्याचबरोबर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव कौस्तुभ गावडे व नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून माजी आमदार सुधाकर कोहळे यांना भाजपने मैदानात उतरविले आहे.

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघांत महायुतीतील तीनही घटक पक्षांत उमेदवारीसाठी चुरस होती. मात्र, भाजपने सुरुवातीपासूनच हे दोन्ही मतदारसंघ आपलेच आहेत आणि आपल्याकडेच राहतील, अशी भूमिका घेतली होती आणि आता या दोन्ही मतदारसंघांत भाजपने आपले उमेदवार जाहीर केले.

जाधव - पाटील घराण्याचा वारसा

डॉ. स्मितादेवी जाधव या दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक (एमिरेट्‌स‌) डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या स्नुषा व दै. ‘पुढारी’चे समूह संपादक आणि ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्या पत्नी आहेत. दै. ‘पुढारी’चे संस्थापक डॉ. ग. गो. जाधव यांनी त्यावेळच्या मुंबई राज्यात १९४९ साली मुंबई असेंब्लीवर पहिले आमदार म्हणून कोल्हापूरचे प्रतिनिधित्व केले होते. डॉ. स्मितादेवी जाधव या बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांची नात आहेत. डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ पिंपरी पुणेचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या कन्या तसेच आमदार सतेज डी. पाटील यांच्या भाची आहेत.

सासर, माहेरची राजकीय पार्श्वभूमी

डॉ. स्मितादेवी जाधव यांना सासर आणि माहेरची राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. महिला सक्षमीकरण आणि उद्योग क्षेत्रात त्यांनी आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटविला आहे. डॉ. डी. वाय. पाटील पिंपरी पुणे च्या प्र-कुलगुरू पदाबरोबर ‘पुढारी’ पब्लिकेशनच्या संचालिका, टोमॅटो ९४.३ एफ.एम., आपलं एफ.एम. ९१.९ च्या कार्यकारी संचालक व कस्तुरी क्लबच्या त्या अध्यक्षा आहेत.

शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान

शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देताना त्या नव्या कल्पना, सर्जनशीलता आणि धोरणात्मक नेतृत्वाचा मेळ घालत आहेत. कस्तुरी क्लबच्या माध्यमातून १८ हजारांवर महिलांचे नेटवर्क त्यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिले आहे. महिलांचा सामाजिक कार्यातील सहभाग वाढावा, त्यांच्या नेतृत्वाला वाव मिळावा आणि त्यांच्या उद्योजकतेसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचे प्रयत्न सतत सुरू असतात.

भाजप नेत्यांकडून निवड

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरू होती. महाराष्ट्र प्रदेश भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी पाचही मतदारसंघांतून संभाव्य उमेदवारांची नावे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे पाठवली होती. प्रत्येक मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, संघटनात्मक ताकद, संभाव्य समीकरणे यांचा विचार करून उमेदवारांची निवड करण्यात आली. शनिवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नवी दिल्लीतील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि संभाव्य उमेदवार यांच्या नावावर चर्चा झाली. त्यानंतर या तीन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

आज अर्ज दाखल करणार

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. ६ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. डॉ. स्मितादेवी जाधव या सोमवारी (दि. ५) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर हे पाच जिल्हे असा मतदारसंघाचा विस्तार आहे.

दरम्यान, रविवारी (दि. ४) डॉ. स्मितादेवी जाधव यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुण्यातील कार्यक्रमात त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. याचवेळी पुणे शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांचाही पक्षप्रवेश झाला. रवींद्र चव्हाण यांनी त्यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

पक्षप्रवेशाचे स्वागत : मोहोळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून डॉ. स्मितादेवी जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाचे आपण स्वागत करतो, अशा भावना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news