

मुंबई : दै. ‘पुढारी’च्या लोकप्रिय ‘टोमॅटो एफएम’ या रेडिओ स्टेशनला येथील एका कार्यक्रमात ‘आशा रेडिओ पुरस्कार 2025’ प्रदान करण्यात आला. राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
समाजहिताच्या द़ृष्टीने महत्त्वाच्या कार्यक्रमांचे प्रसारण केल्याबद्दल ‘टोमॅटो एफएम’चा हा गौरव करण्यात आला आहे. राज्य सरकारचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून आयोजित महाराष्ट्र रेडिओ महोत्सवात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
मुंबईच्या नरिमन पॉईंटवरील वाय. बी. सेंटर येथे शनिवारी महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि ‘आशा रेडिओ पुरस्कार 2025’ वितरण सोहळा झाला. ‘टोमॅटो एफएम’ने मनोरंजनाबरोबरच सामाजिक जनजागृतीसाठी सातत्याने भरीव प्रयत्न रेडिओच्या माध्यमातून केले आहेत.
समाजामध्ये सकारात्मक बदल घडवणे आणि समाजोपयोगी माहितीचे प्रसारण करणे यासाठी ‘टोमॅटो एफएम’ने केलेल्या प्रयत्नांवर आशा रेडिओ पुरस्काराने कौतुकाची मोहोर उमटवली आहे. या पुरस्कारामध्ये म्हटले आहे की ‘रेडिओ या माध्यमासाठी आपण दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ‘टोमॅटो एफएम कोल्हापूर’ यांना ‘आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा मराठी कार्यक्रम 2025’ या पुरस्काराने गौरवण्यात येत आहे.