‘मराठी’ला अभिजात दर्जा हा शिवरायांना मानाचा मुजरा : पंतप्रधान मोदी

धर्म वाढविणार्‍या थोर संतांना साष्टांग दंडवत
Prime Minister Narendra Modi was felicitated by Chief Minister Eknath Shinde
मुंबई : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल शनिवारी वांद्रे येथे झालेल्या अभिजात मराठी सन्मान सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष सत्कार केला. Pudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई : मराठी भाषेचा इतिहास समृद्ध आहे. मराठी भाषेतून निघालेल्या ज्ञानाच्या झर्‍यांनी अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केले आहे आणि आजही आपल्याला ते रस्ता दाखवत आहेत. संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरीच्या ज्ञानातून भारतात आध्यात्मिक प्रज्ञेला पुनर्जागृत केले. महाराष्ट्र आणि धर्म वाढविणार्‍या थोर संतांना मी साष्टांग दंडवत करतो. मराठी भाषेला दिलेला अभिजात दर्जा संपूर्ण देशाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्यभिषेकावर्षी केलेला मानाचा मुजरा असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काढले.

माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठीसह पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषेचाही अभिजात भाषांमध्ये समावेश केला. त्याबद्दल महायुती सरकारने मराठी भाषेच्या गौरवार्थ व पंतप्रधान मोदी यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वांद्रे येथे अभिजात मराठी सन्मान सोहळा आयोजित केला होता. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, पार्श्वगायिका आशा भोसले, सिनेअभिनेते सचिन पिळगावकर, ज्येष्ठ साहित्यिक, पद्मश्री नामदेव कांबळे, तुकाराम महाराजांचे वंशज, ज्येष्ठ साहित्यिक, लेखक सदानंद मोरे आदी विविध क्षेत्रांतील दिग्गज मंडळी यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी मराठीतून भाषण करीत मराठीतील थोर संतांविषयी, साहित्यिकांविषयी, स्वातंत्र्यवीरांविषयी गौरवोद्गार काढले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल महाराष्ट्रातील, महाराष्ट्राबाहेरील आणि सर्व जगातील मराठी भाषिकांचे मी मनापासून अभिनंदन करतो. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आहे. हा मराठी भाषिकांसाठी सुवर्णक्षण आहे. महाराष्ट्राचे हे स्वप्न पूर्ण करण्याचे सौभाग्य मला मिळाले याचा मला अभिमान आहे, असे मोदी म्हणाले.

संत नामदेव यांनी मराठी भाषेतून भक्ती मार्गाच्या चेतनेला मजबूत केले. संत तुकाराम यांनी मराठी भाषेतून धार्मिक जागरुकतेचे अभियान राबवले आणि संत चोखा यांनी सामाजिक परिवर्तनाच्या आंदोलनाला सशक्त केले, असे मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले. लोकमान्य टिळक यांनी इंग्रजांची पाळेमुळे हलवली होती. महाराष्ट्राने न्याय आणि समानतेचा लढा लढण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या मराठी वृत्तपत्र सुधारक याच्या माध्यमातून सामाजिक सुधारणेच्या अभियानाला घराघरामध्ये पोहोचवले. स्वतंत्रता संग्रामाला दिशा देण्यासाठी गोपाळ कृष्ण गोखले यांनीही मराठी भाषेला माध्यम बनविले, असे मोदी म्हणाले. मराठी साहित्य ही भारताची अनमोल विरासत आहे. यामध्ये आपल्या सभ्यतेचा विकास आणि सांस्कृतिक गाथा सुरक्षित आहे. महाराष्ट्रात मराठी साहित्याच्या जोरावर स्वराज्य, स्वदेशी, स्वभाषा आणि स्वसंस्कृतीच्या चेतनेचा विकास झाला. स्वतंत्रता आंदोलनावेळी सुरू झालेला गणेशोत्सव आणि शिवजयंतीचे कार्यक्रम, वीर सावरकर यांच्यासारख्या क्रांतिकारकांचे विचार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक समता आंदोलन, महर्षी कर्वे यांचे महिला सशक्तीकरण अभियान, महाराष्ट्राचे औद्योगिकीकरण या सर्वांची प्राणशक्ती मराठी भाषाच होती.

पंतप्रधान मोदी म्हणाले, मराठी भाषेला हा गौरव देण्यासाठी मराठी साहित्यकार, लेखक, कवी आणि असंख्य मराठीप्रेमींनी अथक प्रयत्न केलेत. मराठी भाषेला दिलेल्या अभिजात दर्जेच्या मान्यतेमुळे अनेक प्रतिभावंत साहित्यांच्या सेवेचा प्रसाद मिळाला आहे. यामध्ये बाळशास्त्री जांभेकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, केशवसुत, श्रीपाद महादेव माटे, आचार्य अत्रे, शांताबाई शेळके, ग. दि. माडगूळकर, कुसुमाग्रज यांच्यासारख्या विभूतींचे योगदान अतुलनीय असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी चित्रपटसृष्टीनेही आपल्याला गौरवित केले आहे. आज भारतात जे सिनेमाचे स्वरूप आहे, त्याचा आधार देखील व्ही. शांताराम व दादासाहेब फाळके यांनी तयार केला होता असे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले, मराठी संगीत, लोकसंगीत, लोकनृत्याची परंपरा आपल्यासोबत एक समृद्ध विरासत घेऊन पुढे जात आहे. बालगंधर्व, डॉ. वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, सुधीर फडके, मोगुबाई कुर्डीकर, लता मंगेशकर, आशा मंगेशकर, शंकर महादेवन, अनुराधा पौडवाल यांच्या सारख्या दिग्गजांनी मराठी संगीताला एक वेगळी ओळख दिली, असे मोदी यांनी सांगितले.

‘त्या’ लहान मुलीने मराठी शिकवले

माझ्या आयुष्याच्या सुरुवातीला मी गुजरातमधील ज्या भागात राहत होतो, तिकडे एक मिल होती. त्या मिलच्या वसाहतीमध्ये महाराष्ट्रात एक मराठी भिडे कुटुंब राहत होते. शुक्रवारच्या सुट्टीच्या दिवशी मी त्या कुटुंबीयांना भेटायला जात होतो. त्यांच्या शेजारी एक लहान मुलगी राहत होती. ती माझ्याशी मराठीत संवाद साधायचा. पुढे ती मुलगी माझी गुरू बनून तिने मला मराठी शिकवले, अशी आठवणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितली.

तीन मराठी पुस्तकांचे गुजरातीत भाषांतर

नरेंद्र मोदी म्हणाले की, मध्यंतरी माझे मराठीशी नाते तुटले होते. पण मी 2 ते 3 मराठी पुस्तकांचे गुजरातीमध्ये भाषांतर केले आहे. पण 40 वर्षांपासून माझा हा संपर्क कमी झाला आहे, अन्यथा मी याहीपेक्षा मराठीतून चांगल्या प्रकारे बोलू शकलो असतो, असे मोदी म्हणाले. आजच्या कार्यक्रमात मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतूनच केली. पोहरादेवी येथील कार्यक्रमातही सुरुवातीची काही मिनिटे ते मराठीतूनच बोलले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news