Pre Marital Investigation: लग्नाआधी गुप्त चौकशीचा ट्रेंड वाढला; फसवणूक टाळण्यासाठी खासगी गुप्तहेरांची मदत

लग्नास 'होकार' देण्यापूर्वी वर- वधूची गुप्त चौकशी करण्याचा कल वाढला
Marriage
Marriage file photo
Published on
Updated on

महेश पांचाळ

मुंबई: लग्न जुळवताना कुंडली, शिक्षण, नोकरी आणि कुटुंबाची माहिती तपासण्याची पारंपरिक पद्धत आता बदलत आहे. वाढत्या फसवणुकीच्या घटना, विवाहानंतर उघड होणारे आधीचे संबंध, आर्थिक व्यवहारांतील अपारदर्शकता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटनांमुळे अनेक कुटुंबे आता 'होकार' देण्यापूर्वीच भावी वधू-वरांची सखोल पडताळणी करण्यासाठी खासगी गुप्तहेरांची मदत घेत आहेत.

परिणामी, विवाहपूर्व (प्री-मॅरिटल) चौकशी हा खासगी गुप्तहेर संस्थांसाठी सर्वाधिक मागणीचा विषय ठरु लागला आहे. याला सर्वांत मोठे कारण ठरले ते लोहगडावर सिया गोयलने केलेली केतन अग्रवालची हत्‍या!

Marriage
Cluster Scheme: नवी मुंबईच्या क्लस्टर योजनेवरून महायुतीत खडाजंगी; शिवसेना-भाजप आमनेसामने

मुंबईतील गुप्तहेर संस्थांच्या म्हणण्यानुसार, अलीकडील काही गाजलेल्या घटनांनंतर विवाहपूर्व चौकशीसाठी येणाऱ्या विचारणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणानंतर पालक अधिक सतर्क झाले आणि खासगी गुप्तहेरांकडे येणाऱ्या चौकशी आणि प्रत्यक्ष तपासाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली. विवाहानंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा विवाहापूर्वीच सत्य जाणून घेण्याला कुटुंबे प्राधान्य देत आहेत.

खासगी गुप्तहेरांमार्फत होणार्‍या विवाहपूर्व चौकशीत पूर्वीचे प्रेमसंबंध, लपविलेले विवाह किंवा घटस्फोट, आर्थिक स्थिती, मोठे कर्ज, न्यायालयीन वाद, गुन्हेगारी रेकॉर्ड, व्यसनाधीनता, नोकरी व शैक्षणिक पात्रतेची सत्यता, कौटुंबिक पार्श्वभूमी तसेच सोशल मीडियावरील सार्वजनिक वर्तनाची पडताळणी केली जात आहे. अनेक पालक आता ऐकीव माहितीवर अवलंबून न राहता पुराव्यानिशी खातरजमा करूनच विवाहाचा निर्णय घेत असल्याचे दिसते.

गुप्तहेर संस्थांनी सांगितलेल्या काही ताज्या प्रकरणांमध्ये भावी वराने मोठे कर्ज आणि सुरू असलेले न्यायालयीन वाद लपविल्याचे चौकशीत उघड झाल्याने एक साखरपुडा मोडण्यात आला. शैक्षणिक पात्रता आणि नोकरीबाबत चुकीची माहिती दिल्याचे समोर आल्याने एक विवाहच रद्द करण्यात आला.

Marriage
BMC Car Proposal: मुंबई महापालिकेतील गाड्यांच्या प्रस्तावावर फडणवीसांचा संताप; भाजप नेत्यांची कानउघाडणी

मॅट्रिमोनियल संकेतस्थळे आणि डेटिंग ॲप्सच्या वाढत्या वापरामुळे अनोळखी व्यक्तींशी विवाह ठरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेही स्वतंत्र पडताळणी करण्याचा कल वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, मोबाईल हॅक करणे, खासगी संदेश किंवा कॉल रेकॉर्ड मिळवणे, सोशल मीडिया खाते फोडणे अथवा बेकायदेशीर पाळत ठेवणे हा कायद्याने गुन्हा असल्याने विवाहपूर्व चौकशीही कायदेशीर चौकटीतच व्हायला हवी, असे कायदेतज्ज्ञांनी स्पष्ट केले .

'विश्वासासोबत पडताळणी' हा नवा मंत्र स्वीकारत अनेक कुटुंबे आता लग्न जुळवताना कुंडलीसोबतच 'बॅकग्राऊंड रिपोर्ट'लाही तेवढेच महत्त्व देत असल्याचे चित्र मुंबईसह राज्यभर दिसून येत आहे.

'कुंडलीपेक्षा चारित्र्य महत्त्वाचे' : रजनी पंडित

मुंबईतील प्रसिद्ध खासगी गुप्तहेर रजनी पंडित म्हणाल्या, "चेहऱ्यामागे लपलेले चेहरे शोधण्याचे काम आम्ही करतो. पूर्वी विवाहानंतर पती-पत्नीमधील विवाहबाह्य संबंधांची चौकशी करण्यासाठी लोक आमच्याकडे येत असत.

आता चित्र पूर्णपणे बदलले आहे. आजची पिढी कुंडलीपेक्षा भावी जोडीदाराचे चारित्र्य, निर्व्यसनी जीवन, शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि मालमत्तेची सत्यता तपासण्यावर भर देते. विवाहपूर्व चौकशीसाठी येणारे फोन इतर कामांपेक्षा अधिक असतात. माझ्या ४० वर्षांच्या अनुभवाच्या आधारे प्रथम संबंधितांना मार्गदर्शन करते. समाधान न झाल्यासच सखोल चौकशीची जबाबदारी स्वीकारते."

'महिन्यातून एक कॉल; आता दिवसाला चार'

अंधेरी-लोखंडवाला येथील टॉप सिक्रेट डिटेक्टिव्ह सर्व्हिसचे संचालक सचिन सावंत म्हणाले, "दोन वर्षांपूर्वी विवाहपूर्व चौकशीबाबत महिन्यातून एखादी विचारणा होत होती. आता दिवसाला किमान चार फोन येतात. त्यापैकी दोन प्रकरणांची दररोज नोंदणी होते. इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे संपर्क वाढला असला, तरी त्याचे दुष्परिणामही समाजात दिसून येत आहेत. त्यामुळे पालक आता ऐकीव माहितीवर अवलंबून न राहता पुराव्यानिशी पडताळणी करूनच निर्णय घेत आहेत."

'पालकांचा कल झपाट्याने वाढला'

कुर्ल्यातील एका खासगी गुप्तहेर संस्थेच्या प्रमुखांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, "गेल्या दहा वर्षांपासून आम्ही अत्यंत गोपनीय पद्धतीने अशा प्रकरणांचा तपास करतो. पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणानंतर विवाहपूर्व गुप्त चौकशीबाबत पालकांचा कल झपाट्याने वाढला आहे. दिवसाला मोठ्या प्रमाणात विचारणा होत असून अनेक प्रकरणांचा प्रत्यक्ष तपास सुरू आहे."

विवाहपूर्व चौकशीत काय तपासले जाते?

  • पूर्वीचे प्रेमसंबंध, विवाह किंवा घटस्फोट

  • शिक्षण व नोकरीची सत्यता

  • पगार, आर्थिक स्थिती आणि कर्ज

  • गुन्हेगारी किंवा न्यायालयीन प्रकरणे

  • व्यसनाधीनता

  • कौटुंबिक पार्श्वभूमी

  • मित्रपरिवार व जीवनशैली

  • सार्वजनिक वर्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news