

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) 79(अ) कलमांतर्गत दिलेल्या 935 नोटिसा उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवल्यानंतरही काही इमारतींतील रहिवाशांना त्यांची घरे सोडण्यास भाग पाडले जात आहे. प्रभादेवी येथील हाजी नुरानी व लक्ष्मी निवास इमारतींना वीज तोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. वीज तोडण्यासाठी आलेल्या बेस्टच्या कर्मचार्यांना रहिवाशांनी हुसकावून लावले.
इमारत धोकादायक झालेली असून पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर करा, अशी सूचना करणारी 79(अ) नोटीस म्हाडाने काही महिन्यांपूर्वी हाजी नुरानी व लक्ष्मी निवास या इमारतींना पाठवली होती. या इमारतींसह एकूण 19 उपकरप्राप्त इमारती प्रभादेवी स्थानकालगत वसलेल्या आहेत. अटल सेतूवरून थेट वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडणार्या वरळी-शिवडी उन्नत जोडरस्त्यासाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल तोडण्यात येणार आहे.
यात 19 इमारती बाधित होणार होत्या. दरम्यानच्या काळात पुलाच्या आरेखनात बदल होऊन 17 इमारती वाचवण्यात आल्या. हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या दोनच इमारती आता बाधित होणार आहेत. त्यांतील 84 रहिवाशांना कुर्ला येथे कायमस्वरुपी घरे देण्यात येणार होती.
एप्रिल महिन्यात पुलाचे पाडकाम सुरू करत असताना रहिवाशांनी त्यात अडथळा आणला. पुलाच्या कामादरम्यान उर्वरित 17 इमारतींनाही हादरे बसण्याची भीती रहिवाशांना आहे. सर्व 19 इमारतींतील रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबतचे ठोस धोरण तयार होत नाही तोपर्यंत पूल बंद करू देणार नाही, अशी भूमिका घेत रहिवाशांनी आंदोलन केले होते. त्यानंतर सर्व 19 इमारतींचा एमएमआरडीएतर्फे त्याच ठिकाणी पुनर्विकास करण्याचा निर्णय झाला; मात्र नगरविकास विभागाने त्याबाबत आवश्यक कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे वरळी-शिवडी रस्ता व इमारतींचा पुनर्विकास हे दोन्ही प्रश्न अधांतरी आहेत.
म्हाडाने 79(अ) कलमांतर्गत दिलेल्या 935 नोटिसांवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. असे असतानाही हाजी नुरानी व लक्ष्मी निवास यांच्या अतिधोकादायक असण्यावर म्हाडा ठाम आहे. त्यामुळे मंगळवारी बेस्टचे कर्मचारी वीज तोडण्यासाठी हाजी नुरानीमध्ये पोहोचले होते. त्यांना रहिवाशांनी हुसकावून लावल्याची माहिती रहिवासी मुनाफ ठाकूर यांनी दिली.