मुंबई : मुंबई उपनगरांतील लोकसंख्येमध्ये वाढ होत असून यात मालाड, कुर्ला, गोवंडी व अंधेरी पूर्वेकडील लोकसंख्येची वाढ सर्वाधिक आहे. तीनही विभागांमध्ये राज्यातील एका छोट्या शहरापेक्षा जास्त लोकसंख्या असून मालाड येथील लोकसंख्या 9 लाख 84 हजारांपेक्षा जास्त असून यात दरवर्षी वाढ होत आहे.
2023 नुसार मुंबईतील लोकसंख्या सुमारे 1 कोटी 30 लाख 14 हजार 390 इतकी आहे. यात गेल्या दोन वर्षात सुमारे 3 ते 4 लाखांनी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईत शहर विभागापेक्षा उपनगरांत लोकसंख्येमध्ये सर्वाधिक वाढ होत आहे. उदाहरणार्थ दक्षिण मुंबईतील म्हणजे नरिमन पॉईंट, कुलाबा, फोर्ट आदी भागातील लोकसंख्येची तुलना केल्यास मालाडची लोकसंख्या पाच पटीने जास्त आहे. शहर, पश्चिम उपनगर व पूर्व उपनगर या तिन्ही भागांची तुलना केल्यास सर्वाधिक 57 लाख 81 हजार 123 लोकसंख्या पश्चिम उपनगरांत आहे. पूर्व उपनगरांतील लोकसंख्या 40 लाख 6 हजार 11 असून शहर विभागातील लोकसंख्या 32 लाख 27 हजार 256 आहे.
उपनगरांतील सर्वाधिक लोकसंख्या पालिकेच्या मालाड पी उत्तर विभागात वाढत आहे. त्या खालोखाल पूर्व उपनगरांतील कुर्ला एल विभागातील लोकसंख्या वाढत आहे. त्यानंतर अंधेरी के पूर्व व गोवंडी एम पूर्व विभागातील लोकसंख्याही वाढताना दिसून येत आहे. या चार विभागांपैकी कुर्ला येथील लोकसंख्या 9 लाख 43 हजारांच्या घरात पोहचली आहे. अंधेरी पूर्व व गोवंडी विभागाने लोकसंख्येचा सुमारे साडेआठ लाखाचा टप्पा ओलांडला आहे. अंधेरी पश्चिम भांडुप व कांदिवलीतील लोकसंख्येतही वाढ होत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या पूर्वीच्या 24 विभागांतील डोंगरी मोहम्मद अली रोड, पायधुनी या बी विभागातील लोकसंख्या शहरातील अन्य विभागातील लोकसंख्येपेक्षा सर्वात कमी म्हणजे 1 लाख 33 हजार 142 इतकी आहे. त्यानंतर कमी लोकसंख्या असलेल्या विभागामध्ये चंदनवाडी सी विभाग येतो. या विभागाची लोकसंख्या 1 लाख 73 हजार 800 इतकी आहे.
मालाड, अंधेरी पूर्व व कुर्ला, गोवंडी, मानखुर्द, भांडुप या विभागात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या भागातील लोकसंख्या अन्य भागापेक्षा जास्त आहे. एवढेच नाही तर या भागात अजूनही झोपडपट्टी वाढत असल्यामुळे लोकसंख्या वाढीचा दरही अन्य विभागापेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.