

मुंबई : मनसेच्या उत्साही पदाधिकार्याने शिवसेना भवनसमोर केलेल्या बनारबाजीने मुंबईतील राजकीय टोलेबाजीला निमित्त मिळाले आहे. ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक, अशी बॅनरबाजी मनसेकडून करण्यात आली. मात्र, स्वतः राज ठाकरे यांनी या मजकुरावर नाराजी व्यक्त केल्यानंतर काही तासात हा बॅनर हटविण्यात आला.
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यात मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत; मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. अशात शिवसेना भवन परिसरात मनसे पदाधिकार्याने लावलेल्या बॅनरमुळे मुंबईतील राजकारण तापले. मनसेचे कुर्ला विधानसभा उपविभाग सचिव लक्की वामन कर्डक यांनी हा बॅनर लावला आहे. त्यावरील फोटोखाली ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक, असे लिहिले.
या बॅनरवरून भाजपने ठाकरे बंधुंवर निशाणा साधला. हीच सरंजामशाही मानसिकता असून, ठाकरेंकडे केवळ सेवक असाव तरच नेत्यांना उमेदवारी मिळते, अशी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.