

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि. १५ जानेवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर (PM Modi Maharashtra visit) आहेत. मुंबईच्या नौदल डॉकयार्डमध्ये पीएम मोदी यांनी आज 'आयएनएस सुरत', 'आयएनएस नीलगिरी' आणि 'आयएनएस वाघशीर' या तीन युद्धनौका राष्ट्रार्पण केल्या. तिन्ही जहाजांची बांधणी मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) येथे करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज मुंबईत आगमन झाल्यावर त्यांना नौदलाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते.
दरम्यान, पीएम मोदी यांच्या हस्ते दुपारी ३.३० च्या सुमारास नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन झाले.
यावेळी बोलताना पीएम मोदी म्हणाले, ''आजचा दिवस भारताचा सागरी वारसा नौदलाच्या गौरवशाली इतिहासासाठी आणि आत्मनिर्भर भारत अभियानासाठी खूप मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाला नवे सामर्थ्य आणि दूरदृष्टी दिली. आज, या पवित्र भूमीवर आपण २१ व्या शतकातील नौदलाला भक्कम करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत आहोत. एकाच वेळी एक डिस्ट्रॉयर, फ्रिगेट आणि पाणबुडी यांचे अनावरण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तिन्हीही युद्धनौका मेड इन इंडिया आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे.''
२१ व्या शतकातील भारताचे सैन्य सामर्थ्य अधिक सक्षम आणि आधुनिक असणे हे देशाच्या प्राधान्यांपैकी एक आहे. पाणी, जमीन, आकाश असो, खोल समुद्र असो अथवा अनंत अवकाश असो, भारत सर्व ठिकाणी आपल्या हितांचे रक्षण करत आहे. यासाठी सतत सुधारणा केल्या जात असल्याचे पीएम मोदी यांनी नमूद केले.
पीएम मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण केलेल्या नौदलाच्या तीन प्रमुख युद्धनौकांमुळे सागरी सुरक्षेमध्ये वाढ होईल. 'आयएनएस सुरत' हे पी१५बी मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक प्रकल्पाचे चौथे आणि शेवटचे जहाज आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक हे जहाज आहे. यातील ७५ टक्के सामग्री स्वदेशी आहे. आयएनएस निलगिरी, हे पी१७ए स्टेल्थ फ्रिगेट प्रकल्पातील पहिले जहाज असून भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन विभागाने त्याची निर्मिती केली आहे. तसेच त्यात उत्कृष्टपणे संकटकाळी तगून रहाण्याची क्षमता असून सागरी सुरक्षा आणि स्टील्थसाठी प्रगत वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत.
आयएनएस वाघशीर, पी७५ स्कॉर्पीन प्रकल्पातील सहावी आणि अंतिम प्रकारातील पाणबुडी आहे. फ्रान्स नौदलाच्या समूहाच्या सहकार्याने तिची बांधणी करण्यात आली आहे. या तिन्ही युद्धनौकांमुळे भारतीय नौदल अधिक सुसज्ज होणार आहे.
आयएनएस नीलगिरी हे पी१७ए स्टेल्थ फ्रिगेट प्रकल्पातील पहिले जहाज आहे. हे जहाज भारताच्या नौदल डिझाइन कौशल्याचे प्रतीक आहे. त्यात प्रगत स्टेल्थ तंत्रज्ञान आणि अधिक काळ टिकून राहण्याची क्षमता आहे.