

मुंबई : कबुतरांची विष्ठा मानवी आरोग्यास घातकच आहे. या विष्ठेमुळे दम्याचा आजार होऊ शकतो. श्वसन विकार जडावल्यास त्याचे दीर्घकाळ दुष्परिणाम होऊ शकतात. एवढेच नव्हेतर श्वसनक्रियाही बंद होऊ शकते अशी माहिती केईएम रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रतिज्ञापत्रावर न्यायालयात बुधवारी सादर केली.
महाराष्ट्र सरकारने कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याचे कारण देत बृहन्मुंबई महानगरपालिकेला (बीएमसी) शहरातील कबूतरखाना बंद करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) अलिकडेच कारवाई सुरू केली. पालिकेच्या कारवाईला आव्हान देत, कारवाईपासून पक्षांना वाचावा, त्यांच्यावर दया करा अशी विनंती करणारी याचिका अॅड.पल्लवी सचिन पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ ड्रॉक्टर याच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मागील सुनावणीत खांडपिठाने पालिकेच्या कारवाईचे समर्थन करत याचिकाकर्त्यांचा समाचार घेतला. या कबुतरांचा नागरिकांवर परिणाम होत असल्याचा पुरावा आहे. वैद्यकीय शास्त्राने प्रगती केली आहे. इंग्लंडमध्यही वृद्ध माणसे मृत्यूमुखी पडली आहेत, असे असताना धोरणाचे पालन का करू नये असा सवाल उपस्थित केला होता. तसेच बीएमसी, राज्य सरकार आणि प्राणी कल्याण मंडळाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार केईएम रुग्णालयाच्या फुफ्फुस विभाग औषध आणि पर्यावरण प्रदूषण संशोधन केंद्राच्या प्रमुख डॉ अमिता आठवले यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. याची नोंद घेत खांडपिठाने याचिकांची सुनावणी उद्या गुरुवारी निश्चित केली.