

मुंबई : राज्यभरात 6 ते 8 ऑगस्टदरम्यान होणार्या पॅट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने अचानक जाहीर केलेल्या सुधारित सुट्ट्यांमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी उशिरा काढलेल्या परिपत्रकात सुट्टीबाबत काही बदल जाहीर करण्यात आले, त्यामुळे पॅट परीक्षा केंद्रांवरील नियोजनाचा संभ्रम वाढला आहे.
शिक्षण विभागाने राज्यभर 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान पॅट परीक्षेचे आयोजन केलेले आहे. उद्या शाळांमध्ये इंग्रजी विषयाचा पेपर होणार आहे. गुरुवारी जारी करण्यात आलेल्या सुधारित सुट्ट्यांबाबतच्या निर्णयाने शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक, मुख्याध्यापकांना नियोजन करायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. सुधारित परिपत्रकामुळे परीक्षेच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. परीक्षेचे पेपर उशिरा आल्यामुळे तसेच पेपर कमी आल्यामुळे यापूर्वीच गोंधळ उडाला होता. त्यात सुट्ट्यांच्या या घोषणेमुळे भर पडली आहे.
सुधारित परिपत्रकामध्ये 16 ऑगस्टची गोपाळकाल्याची सुट्टी आणि गणपती विसर्जनाची 6 सप्टेंबरची अनंत चतुर्दशीची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. नारळी पौर्णिमा व गौरी विसर्जनाच्या सुट्टीचे स्वागतच परंतु हे सर्व नियोजन यापूर्वीच केले असते तर गोंधळ उडाला नसता, असे शिक्षक भारती संघटनेने म्हटले आहे. यापूर्वी शिक्षण विभागाकडे पत्राद्वारे विनंती केली होती की, शाळांचे नियोजन वर्षाच्या सुरुवातीलाच करावे, अचानक नियोजनात बदल केल्यामुळे विद्यार्थी पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होते.
शिक्षण विभागात सामान्य प्रशासनाच्या पत्रानुसार सुट्ट्या जाहीर होत नाहीत. तर त्यासाठी शिक्षण विभागाचे स्वतंत्र पत्र यावे लागते. त्यामुळे कोणीही गोंधळात पडू नये. शिक्षण विभागाचे पत्रक येईपर्यंत वाट पाहावी, असे शिक्षक भारतीने म्हटले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) शुक्रवार, 8 ऑगस्ट रोजी होणार्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यादिवशी नारळी पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर केल्यामुळे या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नियोजित वेळापत्रकानुसार सकाळच्या सत्रात फार्मसी आणि एमएड तर दुपारच्या सत्रात एमए आणि एमकॉमच्या परीक्षा होत्या. परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार असून याबाबतचे परिपत्रक विद्यापीठातर्फे निर्गमित केले जाणार असल्याचे संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.