

मुंबई : वांद्रे पूर्व गरीबनगरमधील अनधिकृत झोपडपट्टीवर सलग तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. या कारवाईसाठी रेल्वेने पूर्वेकडील दोन्ही पादचारी पूल बंद ठेवले आहेत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना तसेच येथून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे पूर्वेत बाहेर पडताना प्रचंड हाल होत आहेत. त्यात या कारवाईचे कारण सांगत रिक्षा, टॅक्सीचालकसुद्धा प्रवाशांच्या इच्छितस्थळी जाण्यास नकार देऊन मनमानी करीत आहेत.
बाहेरगावावरून वांद्रे स्टेशनवर आलेल्या किंवा येथून बाहेरगावी जाण्यासाठी वांद्रे टर्मिनस किंवा कुर्ला टर्मिनसकडे जाण्याऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वेकडून जरी याबाबत उद्घोषणा सुरू असली, तरी एका पुलावरून दुसऱ्या पुलावर कुटुंबासह सामान घेऊन जाताना प्रवाशांची दमछाक होत आहे.
रेल्वेने गरीबनगरमध्ये कारवाई सुरू केल्यापासून रिक्षा किंवा टॅक्सीचालकांना थेट पादचारी पुलाजवळ वाहन घेऊन जाण्यास पोलिसांकडून मज्जाव केला जातो. त्यामुळे वांद्रे कुर्ला संकुल, गव्हर्नमेंट कॉलनी, कुर्ला स्टेशन किंवा धारावी येथून वांद्रे रेल्वे स्थानकावर येण्यासाठी रिक्षा, टॅक्सीवाले मनमानी भाडे आकारून प्रवाशांना लुबाडत आहेत, तर दुसरीकडे येथील शेअर रिक्षा स्थानके स्टेशनपासून दूर हलविल्यामुळे अपंग, गरोदर महिला, शालेय विद्यार्थी तसेच वृद्ध नागरिकांना रिक्षा मिळवताना प्रचंड हाल होत आहेत.