

मुंबई : नियमित लोकल ट्रेनने प्रवास करणार्या मुंबईकरांसाठी एक दिलासाजनक बातमी समोर आली आहे. नवी मुंबई ते बोरिवली आणि वसईमार्गे पनवेल स्टेशन विरारला जोडणार्या नव्या लाइनची निर्मिती करण्यात येणार आहे. मागील कित्येक वर्षांपासून या रुटची मागणी केली जात होती. अखेर, बर्याच प्रतीक्षेनंतर या प्रोजेक्टला ग्रीन सिग्नल मिळाला. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. मुंबईतील जवळपास प्रत्येक नागरिकासाठी कामानिमित्त लोकल ट्रेनने प्रवास करणे सोयीचे ठरते.
वसई-विरार आणि कर्जत-खोपोली मार्गावर लोकल ट्रेनची संख्या कमी असल्याकारणाने तिथल्या स्थानिकांना ट्रेनमधून प्रचंड गर्दीत प्रवास करावा लागतो. त्यासाठी हा मार्ग दिलासादायक ठरणार आहे.
69. 23 किलोमीटर लांब
बोरिवलीच्या एका टोकावर आणि वसईच्या एका टोकावर दोन्ही बाजूंनी ही लाइन असेल. 69. 23 किलोमीटर लांब असलेली ही उपनगरीय रेल्वे लाइन अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. सध्याच्या, पनवेल-दिवा-वसई मार्गिकेप्रमाणेच, ही नवी मार्गिका किंवा कॉरिडॉर पनवेल-कर्जत मार्गिकेप्रमाणे, स्वतंत्र पद्धतीने चालेल.
यामुळे कनेक्टिव्हिटी अधिक चांगली होईल तसेच प्रवाशांसाठी गर्दी कमी करण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. एमयुटीपी 3 ब अंतर्गत बदलापूर आणि कर्जत दरम्यान तिसरी लाइन तसेच आसनगाव आणि कसारा दरम्यान चौथ्या लाइनचे देखील काम सुरू आहे. या सर्व मार्गांवर एकूण 14907.47 करोड खर्च केला जाणार आहे.
एकूण 12710.82 कोटी रुपये खर्च
पनवेल-बोरीवली-वसई कॉरिडॉर बांधण्यासाठी एकूण 12710.82 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात येते. ही लोकललाइन मुंबई शहरी वाहतूक योजनेंतर्गत (एमयुटीपी 3 ब) बांधली जाणार आहे. पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी प्रदान करून लोकल ट्रेनची गर्दी काही प्रमाणात कमी करण्याचा पनवेल-बोरीवली-वसई मार्गिकेचा उद्देश आहे.