

मुंबई : राजकीय वर्तुळात अशुभ मानला जाणारा रामटेक हा आलिशान बंगला अखेर पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना मिळाला आहे. हा बंगला आधी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आला होता. मात्र, बावनकुळे यांनी तो बदलून घेतल्यामुळे पंकजा मुंडे यांच्या वाट्याला हा बंगला आला आहे. या बंगल्याचा कथित अशुभ इतिहास पाहता त्यांच्या समर्थकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
मलबार हिलवर असलेला रामटेक हा बंगला अत्यंत प्रशस्त आहे. या बंगल्यातून अरबी समुद्राचे मनोहारी दर्शन होते. महसूलमंत्री बावनकुळे यांना तो मिळाला होता. पंकजा मुंडेंना पर्णकुटी बंगला दिला गेला. तथापि, बावनकुळे यांनी हा बंगला नाकारल्याने तो पंकजा मुंडे यांना दिला गेला आहे. या बंगल्यात त्यांचे वडील दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे वास्तव्य असल्याने त्यांनी हा बंगला स्वीकारला आहे. राज्यात 1995 मध्ये शिवसेना - भाजप युतीचे सरकार आले तेव्हा गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्याकडे गृहखाते आले होते. त्यावेळी त्यांचा मुक्काम रामटेकमध्ये होता. मात्र, रामटेकमध्ये राहिलेल्या मंत्र्यांच्या राजकारणाला पुढील काळात उतरती कळा लागल्याने हा बंगला अशुभ मानला जाऊ लागला.
1995 मध्ये युती सरकार असताना गोपीनाथ मुंडे रामटेक बंगल्यात वास्तव्याला होते. त्यानंतर युती सरकार गेले. राज्यात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार पहिल्यांदा सत्तेवर आले तेव्हा याच बंगल्यात छगन भुजबळ राहायला आले. त्यावेळी त्यांच्यावर तेलगी प्रकरणात गंभीर स्वरूपाचे आरोप झाले आणि स्टॅम्प पेपर घोटाळा प्रकरणी भुजबळ यांना राजीनामा द्यावा लागला. 2014 मध्ये राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले तेव्हा सरकारमध्ये दुसर्या क्रमांकाचे मंत्री एकनाथ खडसे हे रामटेक मुक्कामी होते. अल्पावधीतच त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांचा राजकीय वनवास सुरू झाला आणि तो अजूनही संपलेला नाही.
2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री झाले. त्यांना कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. सरकार अडीच वर्षांतच कोसळले. या काळात भुजबळ यांचा मुक्काम रामटेक बंगल्यातच होता. ठाकरे सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आले. या सरकारमध्ये दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री झाले आणि त्यांना रामटेक बंगला मिळाला. नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा महायुती सरकार सत्तेवर आले. मात्र, केसरकरांचे मंत्रिपद गेले. त्यामुळे रामटेक बंगला मंत्र्यांना नकोसा झाला होता. बावनकुळे यांना सुरुवातीला हा बंगला दिला गेला. मात्र तो त्यांनी बदलून घेतला.
रामटेक बंगल्यात राहात असताना दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनाही 1995 च्या लातूरच्या विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. नंतर त्यांना रामटेक सोडावा लागला होता. त्यानंतर 1996 मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत निम्म्या मतामुळे विलासराव देशमुख यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर ते चार वर्षे राजकीय वनवासात गेले होते.
‘रामटेक’ बंगला ज्या मंत्र्याला मिळाला आणि ज्या मंत्र्याने ‘रामटेक’मध्ये वास्तव्य केले, त्याचे मंत्रिपद जाते, असा काहीसा अंधविश्वास सध्या वाढीस लागला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्यांना मिळालेल्या ‘रामटेक’मध्ये वास्तव्यास नापसंती दर्शवली आहे. मात्र, शरद पवार यांच्यासाठी हाच रामटेक बंगला कधी काळी ‘लकी’ ठरला होता. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी 18 जुलै 1978 रोजी वसंतदादांचे संयुक्त सरकार पाडले आणि ‘पुलोद’चे सरकार आणले होते. त्यावेळी ‘रामटेक’ पवारांसाठी कसा लकी ठरला, याचे स्मरण होते.