

मुंबई : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्याच्या माध्यमातून पंढरपूरचा कायापालट केला जाणार आहे. हा संपूर्ण विकास आराखडा नगरविकास विभागामार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वारकऱ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच स्थानिकांच्या हिताचे संरक्षण, पुनर्वसन आणि रोजगारनिर्मितीला प्राधान्य दिले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत विधान भवनात बैठक झाली, त्यावेळी फडणवीस बोलत होते. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आमदार समाधान अवताडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हा आराखडा पंढरपूरच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
दरम्यान, पंढरपूर नगरपरिषद क्षेत्रातील बाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी मिळावी यासाठी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नगर विकास विभागाकडे प्रस्तावही सादर केला आहे. त्यामुळे विकासकामे अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.