Women Empowerment Palghar
वाडा : पावसाळ्यात जिभेचे चोचले पुरवायला सर्वांनाच आवडत असून जेवणात काहीतरी रुचकर असले की रंगत वाढते. कोकणात विशेषतः पावसाळ्यासाठी अनेक पारंपारिक पदार्थ उन्हाळ्यातच आवडीत बनविले जातात. पापड, खारोड्या, मिरगुटली असे अनेक पदार्थ हल्ली रेडीमेड विकत घेण्याकडे कल वाढत असून यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध होत आहे.
कोकणातील लोकांच्या ताटात पापडाची जागा फिक्स असून खारोड्या, मिरगुटली, कुरडई, पापडी असे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. पदार्थ चविष्ट असले तरी ते बनविण्यासाठी मात्र मोठी कसब व मेहनत लागत असून कडक उन्हात हे पदार्थ सुकवावे लागतात. अवकाळी पावसाने सर्वत्र हाहाकार माजविला असून ऐन उन्हाळ्यात पावसाळा सुरू झाल्याने पावसाळ्यातील साठवणूक राहून गेली आहे.
वाडा शहरातील विविध भागात घरगुती पद्धतीने बनविलेल्या वस्तूंची मागणी वाढली आहे. महिलांसह बचत गटांना यामुळे मोठा रोजगार उपलब्ध झाला असून अनेक महिलांचे आर्थिक गणित यामुळे सुधारले आहे. पापड, लोणचे यांसह तांदुळाच्या भाकरी, पुरणपोळ्या, मोदक, दिवाळीत फराळ, घरगुती मांसाहारी जेवण अशा माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाला असून चांगल्या व घरगुती वस्तू मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
पापड प्रति किलो 380 ते 400 , खारोड्या 300 ते 400, मिरगुटली 400, कुरडई 300 ते 350, साबुदाण्याच्या खारोड्या 400 अशा दरात पदार्थ उपलब्ध आहेत.