संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा आमचा प्रयत्न!

अर्थसंकल्‍पीय अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याची पत्रकार परिषद
अर्थसंकल्‍पाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारने पत्रकार परिषद घेतली.
अर्थसंकल्‍पाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारने पत्रकार परिषद घेतली. Image Source X
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सोमवारपासून सुरु होणाऱ्या अर्थसंल्‍पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्‍त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्‍हणाले की यंदाचा राज्‍याचा अर्थसंकल्‍प सर्वसमावेशक असणार आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अतिशय चांगला व संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. आर्थिक शिस्त पाळताना भांडवली खर्चावर परिणाम होणार नाही, तसेच कोणतीही फ्लॅगशिप योजना बंद करणार नाही, अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. पत्रकारपरिषदेपुर्वी चहापानाचा कार्यक्रम पार पडला.

पुढे मुख्यमंत्री म्‍हणाले की नव्या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. या अधिवेशनात दोन विषयांवर महत्त्वाच्या चर्चा होणार आहेत. ८ मार्चला महिला दिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्मशताब्दीनिमित्ताने विशेष चर्चा होणार आहे. तसेच भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त दोन दिवस संविधानावर चर्चा होणार आहे. या अधिवेशनात पाच विधेयकांवर चर्चा होईल. असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासंदर्भातही इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील दर कमी आहेत. इतर राज्यात या नंबर प्लेटची किंमत ही जीएसटी व ती प्लेट बसविण्याचा खर्च वगळून आहे तर महाराष्ट्रातील दर हे जीएसटी व प्लेट बसविण्याच्या खर्चासह आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य पुढे नेण्यासाठी काम करत आहोत – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्य शासन हे सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करत आहे. विकास कामांबरोबरच कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. सर्वसामान्यांना चांगले दिवस आणण्यासाठी व राज्याला पुढे नेण्यासाठी आम्ही काम करत आहोत. राज्याच्या विकासाची वाटचाल दुप्पट तर वेग चौपट होईल. याचे प्रतिबिंब येणाऱ्या अर्थसंकल्पात दिसेल. या अधिवेशनात विरोधी पक्षांनी कामकाजात सहभाग घेऊन नागरिकांची, मतदारसंघाची प्रश्ने मांडावीत. त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यात येतील. असेही शिंदे यांनी स्‍पष्‍ट केले.

प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत, या दृष्टीने कामकाज करण्यात येणार आहे. या अधिवेशनात राज्यपाल महोदयांचे अभिभाषण तसेच पुरवणी मागण्यांवर चर्चा होईल. तसेच दोन महत्त्वाच्या विषयांवर विशेष चर्चा होणार आहे. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी राज्य शासनाची आहे.

धनजंय मुंडे यांच्याशी सवांद टाळला ?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी सवांद टाळत असल्‍याचा सह्याद्री अतिथीगृहात सरकरच्या चहापानाच्या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आजच्या अधिवेशनात बीड प्रकरणावरुन खंडाजंगी होण्याची चिन्हे आहेत. त्‍यामुळे अधिवेशनात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची चर्चा सुरु असताना हा व्हिडिओ व्हायरल झाला आहेत.

शिंदे पवार यांची टोलेबाजी

पत्रकार परिषदेत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चांगलीच टोलेबाजी केली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्‍हणाले की आमची व मुख्यमंत्र्यांची खूर्ची जाऊ शकते पण दादांची खूर्ची कायमची राहील. यावर उपमुख्यमंत्री पवार म्‍हणाले की तुम्‍हाला तूमची खुर्ची टिकवता आली नाही असा टोला लगावला यावर तिन्ही नेते खळखळून हसले. यावर मुख्यमंत्री म्‍हणाले माझी व शिंदे यांची खूर्ची रोटेटींग आहे.

चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news