

Raj Thackeray Election Commission: स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूक जाहीर झालेली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली ?, 31 जानेवारी पर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.आपण निवडणुकीसाठी सज्ज आहात का ?, अशी प्रश्नांची सरबत्ती आज मनसे प्रमख राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांच्यावर केली.
आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray), काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई, अनिल परब, शेकापचे नेते जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड, यांच्यासह राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी आज महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (Maharashtra Election Commission) एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत विविध मुद्दे उपस्थित केले.
मतदार यादीत दोन ठिकाणी मतदारांची नावे आहेत.
मतदार यादीत प्रचंड घोळ आहे
जे आज 18 वय पूर्ण करत आहे, त्यांनी मतदान करू नये का ?
निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ, तुम्ही कसं निवडणुकांना सामोरे जाणार ?
31 जानेवारी पर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहे. आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का ?
स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीसाठी व्हिव्हिपॅट मशीन लावा
यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारात अधिक पारदर्शिता आणि त्यातील त्रुटी दूर करण्यासंबंधी महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांना पत्र दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, "येत्या काही महिन्यांत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. परंतु २०२४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांपासून आणि एकंदरीतच निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल राजकीय पक्षांपासून ते सामान्य माणसाच्या मनात खूपच शंका आहेत. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे असे आम्ही सगळेच मानतो, पण सध्याच्या एकूणच निवडणूक आयोगाच्या कारभाराकडे बघितल्यावर, खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का, अशी शंका उत्पन्न होत आहे. असो. निवडणूक आयोग आजही स्वायत्त आहे असं. आम्ही मानतो आणि त्यामुळेच एकूण राजकीय व्यवस्थेच्या मनात आणि सामान्यांच्या मनात काही प्रश्न आहेत आणि त्यावर काही ठोस कृतीदेखील अपेक्षित."