Shiv Sena UBT Operation Tiger Analysis : ‘ऑपरेशन टायगर’ला दीड वर्षांपूर्वी सुरुवात, आठवडाभराच्या नाट्यमय घडामोडींनी शेवट

Operation Tiger Decoded : तर इकडे एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न सुरूच होते. ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी करण्यासाठी ते पूर्णपणे जोर लावत होते.
Operation Tiger Explained: The 18-Month Strategy Behind Shiv Sena UBT Turmoil
Published on
Updated on

Operation Tiger Explained : The 18-Month Strategy Behind Shiv Sena UBT Turmoil

प्रथमेश तेलंग

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नोव्हेंबर २०२४ पार पडली. यामध्ये महायुतीचा अभूतपूर्व विजय झाला. यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘ऑपरेशन टायगर’च्या हालचाली सुरू झाल्या. तेव्हापासून आतापर्यंतच्या कालावधीत पडद्यामागे अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आणि अखेर शिंदे यांनी ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा फोडण्यात यश मिळवले. विशेष म्हणजे २०२२ मध्येही जून महिन्यातच शिवसेनेत याआधीच फूट पडली होती.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. या काळामध्ये राजधानी दिल्लीत ‘डिनर डिप्लोमसी’ घडली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे काही खासदार शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी ‘डिनर’साठी गेले होते. यामुळे ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना बळ मिळाले आणि ठाकरेंच्या गटातील खासदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. या पार्श्वभूमीवर खासदारांची नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हालचाली सुरू केल्या. आदित्य ठाकरे दिल्लीत पोहोचले आणि खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली. यावेळी ठाकरे गटाचे लोकसभेतील सर्व ९ खासदार उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी या सर्व खासदारांसोबत भोजन केले. यावेळी खासदारांचे प्रश्न आणि समस्या ऐकून घेण्यात आल्या. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला आणि सर्व खासदारांनी एकत्र राहणार असल्याची वज्रमूठ बांधण्यात आली. यावेळी ‘ऑपरेशन टायगर’ला तात्पुरता ब्रेक लागला.

दरम्यानच्या काळामध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या खासदारांना पक्षाकडून म्हणावी तशी मदत मिळाली नाही. त्यांना निवडणुका लढण्यासाठी पक्षाकडून निधी मिळाला नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे प्रचारामध्ये जास्त सक्रिय झाले नाहीत, अशी खंत खासदारांनी निवडणुकानंतर खासगीमध्ये बोलून दाखवली. तर इकडे एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न सुरूच होते. ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी करण्यासाठी ते पूर्णपणे जोर लावत होते. भाजपचे केंद्रीय नेतृत्व असो किंवा ठाकरे गटाचे खासदार यांच्याशी सातत्याने संपर्क साधले जात होते. मात्र, आकड्यांची जुळवाजुळव होत नव्हती तसेच भाजपकडून या पक्षफोडीसाठी हिरवा कंदील मिळत नव्हता.

दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या खासदारांची नाराजी वाढत होती. ‘मातोश्री’वर थेट संपर्क होत नाही, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे खासदारांना भेटत नाहीत, वेळ देत नाहीत, त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जात नाहीत, दुःखाच्या काळात देखील उद्धव ठाकरे साथ देत नाहीत, अशा विविध तक्रारी खासदार करत होते. एका खासदाराच्या पत्नीच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी सांत्वन केले नाही. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः फोन करून विचारपूस केली. तसेच एका खासदाराच्या अपघातानंतर उद्धव ठाकरेंनी विचारपूस किंवा मदत केली नाही, अशा प्रकारच्या घटना घडत गेल्या आणि नाराजीमध्ये वाढ होत गेली.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात अर्थात २०२६ च्या सुरुवातीला पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाकरेंच्या खासदारांना संपर्क करण्यात आला. काही खासदारांना ऑफर देखील देण्यात आल्या. मात्र, यावेळी देखील हे ऑपरेशन यशस्वी होऊ शकले नाही. त्यामुळे चर्चा पुन्हा थंड बस्त्यात गेल्या. यानंतर आता शिंदेंनी मागच्या महिनाभरात दिल्ली दौरे वाढवले. यावेळी त्यांनी भाजप नेतृत्वाकडून हिरवा कंदील घेत 'ऑपरेशन टायगर' राबवण्याचे मनावर घेतले आणि अखेर याला भाजपच्या वरिष्ठांकडून हिरवा कंदील मिळाला.

ठाकरे सेनेकडून हालचालींना उशीर

याबाबतचा सुगावा उद्धव ठाकरे यांना लागताच ते सावध झाले. त्यांनी खासदारांना ‘मातोश्री’वर बैठकीसाठी बोलावले. या बैठकीला अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय दिना पाटील हे खासदार उपस्थित होते. तर इतर खासदारांनी विविध कारणे देत ते ऑनलाईन उपस्थित राहिले. दरम्यान, खासदार संजय देशमुख यांनी प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याच्या बातम्या झाल्या. यामुळे या 'ऑपरेशन'ला गती मिळाली. यानंतर उद्धव ठाकरेंनी दिल्लीत हालचाली वाढवल्या. तसेच खासदारांच्या नाराजीला दूर करण्याचे प्रयत्न देखील सुरू ठेवले. शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून बंडखोरांना मान्यता देऊ नये, अशी विनंती केली. तर बंडखोर खासदारांना करोडो रुपये मिळाले असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. दुसरीकडे मंगळवारी (१६ जून) रात्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला पोहोचले आणि ६ खासदारांना देखील बोलावून घेण्यात आले. काही खासदारांसाठी खासगी चार्टर्ड विमान देखील पाठवण्यात आले. अशाप्रकारे रात्रीतून खासदार दिल्लीत पोहोचले. यानंतर बुधवारी (१७) सकाळपासून विविध घटना घडल्या. दिल्लीतील एका हॉटेलमध्ये बंडखोर खासदार आणि एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्या बैठका झाल्या. दिवसभरात विविध बैठकांचे सत्र पार पडले. याच दिवशी या सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे त्यांचे पत्र दिले. यानंतर सोमवारपर्यंत (२२ जून) बंडखोरांपैकी चार खासदार अज्ञातस्थळी होते. तर संजय दिना पाटील मुंबईत आणि ओमराजे निंबाळकर पुणे, धाराशिव, मुंबई येथे दिसले.

खा. श्रीकांत शिंदे यांचा की रोल

खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील ठाकरेंचे खासदार फोडण्यात मोठी भूमिका बजावली. या संपूर्ण घडामोडींमध्ये राजकीय नेत्यांसह अराजकीय व्यक्तींनी देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. या कथेचा शेवट म्हणजे संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे हे ६ खासदार फुटले आणि शिंदेंसोबत गेले. या खासदारांना विविध आश्वासने देखील एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळाली असल्याचे समजते. एकंदर हे 'ऑपरेशन' पूर्ण होण्यासाठी जवळपास दीड वर्षाचा कालावधी लागल्याचे पाहायला मिळते. दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे यांनी देखील वेळोवेळी खासदारांची समजूत काढण्याचा आणि नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केले. मात्र, ते अयशस्वी ठरले. तर अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे तीन खासदार ठाकरेंसोबत आहेत. आता या खासदारांना कायदेशीर अडथळ्यांना देखील सामोरे जावे लागणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून कायदेशीर लढाईची तयारी करण्यात आली आहे.

आता एकनाथ शिंदे हे 'ऑपरेशन' करून शांत बसतात की महाराष्ट्रातील आणखी एखाद्या पक्षाचे खासदार गळाला लावण्याचा प्रयत्न करतात? शिवसेना ठाकरे गटाचे आमदार देखील फोडतात, हे येणारा काळच सांगेल. तसेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रामध्ये आणखी एखादे मंत्रिपद मिळते की त्यांना राज्यामध्ये बढती मिळते हे देखील पाहणे गरजेचे असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news