

मुंबई : राज्यभरात असलेल्या 1 लाख 8 हजार 301 शाळांपैकी केवळ 77 हजार 290 शाळांचे आतापर्यंत ‘जिओ टॅगिंग’ करण्यात आले असून 31 हजार 11 शाळांनी अद्याप नोंदणी केलेली नाही. पुणे जिल्ह्यातील 5526 शाळांची सर्वाधिक नोंद झाली आहे. या पाठोपाठ नाशिक 3 हजार 839 , सोलापूर 3 हजार 988 आणि ठाणे जिल्ह्यातून 3 हजार 586 शाळांनी नोंदणी केली आहे.
प्राथमिक शिक्षणाची संस्कार केंद्र असणार्या अंगणवाड्या, शाळा यांच्या कामकाजात एकसूत्रीपणा आणण्यासाठी राज्यातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रांचे छायाचित्रांसह ‘जिओ टॅगिंग’ करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार आता महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर या संस्थेने शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रांसह टॅग करून भौगोलिक तंत्रज्ञानाद्वारे सर्व माहिती एकत्रित करण्यासाठी महास्कूल जीआयएस मोबाईल अॅप विकसित केले आहे. यामाध्यमातून सध्या नोंदणी सुरु आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 7 हजार 366 शाळा आहेत. त्यापैकी 5526 शाळांचे मॅपिंग झाले आहे. त्याखालोखाल नाशिक जिल्ह्यात 1 हजार 747, नागपूरमध्ये 1355, कोल्हापुरात 1 हजार 338 व नंदुरबारमध्ये 1247 शाळा मॅप न झालेल्या आहेत. तर सिंधुदुर्ग (211), भंडारा (280), वाशिम (460) व हिंगोली (406) या जिल्ह्यांमध्ये नोंद न झालेल्या शाळांची संख्या तुलनेने कमी आहे. ठाणे, सोलापूर, सातारा, संगली आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, त्यातील अनेक शाळांचे मॅपिंग झालेले आहे.