

मुंबई : मुंबईकरांना जास्तीत जास्त ऑॅनलाईन सुविधा देण्यावर महापालिकेने भर दिला जात आहे. आता आपल्या आप्तेष्टांच्या अंत्यसंस्कारासाठी स्माशानभूमी किंवा दफनभूमीची ऑनलाईन नोंदणी करता येणार असून शनिवारपासून ही नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक आरोग्य विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यात आली आहे. शनिवार 19 जुलैपासून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ https://portal.mcgm.gov.in वर नागरिकांसाठी ‘अर्ज करा’ या सदरात ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यावर अंत्यसंस्काराची नोंदणी केल्यानंतर नातेवाइकांना एक नोंदणी क्रमांक मिळेल. काही कारणास्तव अंत्यसंस्काराच्या वेळेत बदल झाला तर तशीही सुविधा यावर आहे. अंत्यसंस्कारासाठी येणार्या नागरिकांना या प्रणालीच्या माध्यमातून वेळेचे नियोजन करणे सोपे होणार आहे, तर स्मशानभूमीतील कर्मचार्यांशीही समन्वय साधण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.
नागरिकांना ऑनलाईन सुविधेबरोबरच प्रचलित पद्धतीनुसारही अंत्यसंस्काराची नोंदणी करण्याची (ऑफलाईन) सुविधादेखील उपलब्ध असेल, असे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
स्मशानभूमी / दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी वेळ नोंदणी (स्लॉट बुक) करणे.
स्मशानभूमी व्यवस्थापनाद्वारे स्मशानभूमी / दफनभूमीमधील उपलब्धता पाहणे.
नागरिकांच्या प्रथेनुसार स्मशानभूमी / दफनभूमी निवडीचा पर्याय.
अंत्यसंस्काराच्या नोंदणीची माहिती, त्यात बदल करणे किंवा रद्द झाल्यास माहिती लघुसंदेश अर्थात ‘एसएमएस’द्वारे प्राप्त होणे