Onion garlic price drop : बाजारात कांदा, लसणाचे दर गडगडले
मुंबई: कांदा व लसूण हा दैनंदिन जेवणामध्ये वापरला जातो.कांदा,लसणाशिवाय जेवण स्वादिष्ठ व रुचकर होत नाही.सध्या बाजारपेठेत चांगल्या दर्जाचा कांदा व लसूणाची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे.याचा परिणाम दोन्हीचे दर गडगडले आहेत.कांदा प्रतिकिलो 16 पासून ते 22 रुपयांपर्यंत तर लसूण 80 रुपयांपासून ते दोनशे रुपयेपर्यंत झाला आहे. श्रावण महिना असल्याने सध्या कांदा, लसणाची विक्री कमी असल्याचे मुंबईतील विक्रेत्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात कांदा हा विशेषत:लासलगांव (जि.नाशिक),नारायणपुर (जि.पुणे ) व लोणंद (जि.सातारा) येथून प्रामुख्याने मुंबईतील बाजारपेठेत येतो.मात्र;यावर्षी कांद्याचे उत्पादन जास्त असल्याने बाजारात कांद्याची आवक मोठया प्रमाणात येत आहे.त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण झाली आहे.काही दिवसांपासून कांद्याच्या दरात घट झाल्याने शंभर रुपयांना 5 किलो असा किरकोळ बाजारात दर झाला आहे.
याबाबत दादर येथील कांदा विक्रेते हरिश्चंद्र भोर म्हणाले,यावर्षी कांद्याची आवक जास्त कांद्याचे भाव गडगडले आहेत.घाऊक बाजारात कांदा 16 ते 22 रुपये तर किरकोळ बाजारात 20 ते 25 रुपये असा त्याचा प्रतिकिलो दर झाला आहे. तसेच घरातील ठेवणीचा कांदा हा नारायणपूरच्या कांद्याला ग्राहकांची सर्वाधिक मागणी आहे. श्रावण सुरु झाल्याने घरगुती ग्राहक व हॉटेल मालक यांची काद्याला मागणी कमी आहे.हा दर किती दिवस राहिल,हे सांगता येणार नाही.
कांद्याबरोबर लसूण याच्या दरातही घट झाली आहे.बाजारात 80 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत लसूणाचा दर गेला आहे. महाराष्ट्रात दरवर्षी मध्यप्रदेश येथील इंदौर,मन्सूर,रतलाम,जावरा तर राजस्थानमधील कोटा व गुजरातमधील राजकोट,जामनगर,गोडवा येथून लसूण येतो.मिडियम,पुनालाडू, फुलगोला,उटी गोला व देशी लसूण असे विविध प्रकार आहेत.देशी लसूण हा चविष्ठ असल्याने सर्वसामान्य ग्राहकांकडून याला सर्वांधिक मागणी असते.
उटी गोला हा लसूण हॉटेलमध्ये वापरला जातो.तो सध्या 160 रुपये प्रतिकिलो इतका आहे.2022 ला लसूणाचा दर हा 20 रुपये तर दुसर्या वर्षी 120 रुपयांवर गेला होता.मात्र;यावर्षी लसूणाचे पीक मोठ्या प्रमाणात आल्याने बाजारात आवक जास्त असल्याने दरावर परिणाम झाला आहे.लसूणाचे दर कमी झाले असल्याचे म्हणणे विक्रेत्यांचे आहे.
80 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत लसणाचे दर
याबाबत लसूण विक्रेते निवृत्ती शेलार यांनी,गतवर्षी ऑगस्टमध्ये याचवेळेला लसूणाचा प्रतिकिलो दर हा 400 रुपयांपर्यंत गेला होता.मात्र; यावर्षी हा दर जवळपास निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. घाऊक बाजारात 80 रुपयांपासून तो 200 रुपयांपर्यंत लसूणाचे दर आहेत.लसणाचे दर कमी झाले असले तरीही ग्राहकांची संख्या वाढली नसल्याचे सांगितले.
