‘एक राज्य, एक नोंदणी’ 1 मेपासून

कोणत्याही निबंधक कार्यालयात जमीन, मालमत्ता खरेदीची नोंदणी होणार
Property purchase registration
‘एक राज्य, एक नोंदणी’ 1 मेपासून
Published on
Updated on
चंदन शिरवाळे

मुंबई : आपल्या राहत्या ठिकाणापासून जवळ असलेल्या किंवा कोणत्याही निबंधक कार्यालयात मालमत्ता खरेदी आणि विक्रीची नोंदणी करण्यासाठी महसूल विभाग 1 मे, महाराष्ट्र दिनापासून ‘एक राज्य, एक नोंदणी’ सुरू करणार आहे. सरकारच्या या धोरणामुळे राज्यातील जनतेला दिलासा मिळणार आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यातील एका ठिकाणचा दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात नोंदविता येत नव्हता. एका जिल्हा सहनिबंधक कार्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या खरेदी-विक्रीच्या दस्तांची नोंदणी त्याच सहनिबंधक कार्यालयामध्ये केली जात आहे. त्यामुळे खरेदीदार आणि विक्री करणार्‍यांचा वेळ आणि पैसे वाया जात होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग ‘एक राज्य, एक नोंदणी’ हा उपक्रम सुरू करत आहे.17 फेब्रुवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांत हा उपक्रम लागू करण्यात आला होता. त्यानंतर 1 एप्रिलपासून पुणे व ठाणे जिल्ह्यांतही तो राबविण्यात आला. पुणे शहर व जिल्ह्यातील एकूण 48 दुय्यम निबंधक केंद्रांमध्ये दस्त नोंदणीला मिळालेला प्रतिसाद पाहून हा उपक्रम राज्यात सुरू केला जात आहे.

‘एक राज्य, एक नोंदणी’ हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत फेसलेस नोंदणी प्रक्रिया राबवण्याचाही विचार आहे. राज्यात ‘डिजिटल इंडिया’ला चालना देण्यासाठी महसूल विभागाने पाऊल उचलले आहे. राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकास कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता यावी, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. राज्यात मालमत्तेचे मूल्यांकन ऑनलाईन केले जाते. त्यामुळे महसुलात तोटा होण्याचा किंवा चुकीच्या मूल्यांकनाला वाव राहिला नाही. तसेच, काही दस्त प्रकारांसाठी फेसलेस नोंदणी सुरू केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या दस्त नोंदणी करणे शक्य होणार आहे. संबंधित पक्षकारांकडून विभागाच्या पोर्टलवर अपलोड केलेली कागदपत्रे विभागाच्या अधिकार्‍यांकडून ऑनलाईन पद्धतीने संमत केली जातील.

डिजिटल स्वाक्षरी असणार अनिवार्य

कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी नसल्यास, दस्तऐवजावर विभागाचा अधिकारी डिजिटल स्वाक्षरी करील. सुरक्षिततेच्या उपायासाठी, फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या पडताळणीद्वारे ओळख अनिवार्य केली जाईल. तसेच, नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीने दस्त सादर करणे अनिवार्य करण्यात येईल, अशी माहितीही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news