

मुंबई : खुशीनगर एक्स्प्रेस शनिवारी पहाटे कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकात दाखल झाल्यानंतर एक्सप्रेसच्या स्वच्छतागृहात एका मुलाचा मृतदेह आढळून आला होता. याचे गुढ उकलेले असून मावस भावाने सुरत येथून अपहरण करून या मुलाची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. पळून गेलेल्या मावस भावाचा शोध सुरू आहे.
याप्रकरणी एलटीटी रेल्वे पोलिसांनी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. उत्तरप्रदेशच्या गोरखपूर येथून निघालेली ही एक्स्प्रेस शनिवारी पहाटे कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकात आली होती. सर्व प्रवाशी उतरल्यानंतर कर्मचारी सफाई करीत असताना बी-दोन एसी कोचच्या स्वच्छतागृहात एका मुलाचा मृतदेह आढळून आला. रेल्वे पोलिसांनी मुलाला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
प्राथमिक तपासात मृत मुलाची ओळख पटली असून तो गुजरातच्या सुरतचा रहिवाशी आहे. शुक्रवारी तो मिसिंग झाला होता. त्याच्या आईने सुरत पोलिसांत त्याच्या मिसिंगची तक्रार केली होती. तपासात तो त्याच्या मावस भावासोबत असल्याचे तसेच ते दोघेही खुशीनगर एक्स्प्रेस प्रवास करत असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे सुरत पोलीस त्याच्या मागावर मुंबईत दाखल झाले होते, मात्र मुंबईत आल्यानंतर त्यांना अपहरण झालेल्या मुलाची हत्या झाल्याचे समजले.
ही माहिती मृत मुलाच्या आईसह नातेवाईकांना देण्यात आली असून ते मुंबईत आले आहेत. मुलाच्या आईच्या जबानीवरुन मावस भावाविरुद्ध हत्येसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचे बोलले जाते.