Handmade Ganesh idol : एक फूट शाडूची मूर्ती तयार करण्यासाठी लागले 15 दिवस
मुंबई : प्रकाश साबळे
पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्याच्या आवाहनाला साद देत बोरिवली येथील एका कुटुंबाने शाडूच्या मातीची एक फुटाची गणपती बाप्पाची मूर्ती तयार केली होती. यासाठी त्यांना 15 दिवस लागले.3 ते 4 किलो माती लागली आणि संपूर्ण मूर्तीसाठी 2 हजार रुपये खर्च आला.
पीओपी मूर्तीच्या विसर्जनानंतर समुद्रात होणार्या प्रदूूषणामुळे न्यायालयासह पालिकेने शाडूच्या मातीचा मूर्ती खरेदी करण्याचे नागरिकांना आवाहन केले होते, तरीसुध्दा नागरिकांचा कौल पीओपी मूर्ती खरेदीकडे गेल्याचे दिसून आले. मात्र, बोरिवली येथील निधी एस. नावाच्या गृहिणीने पहिल्यादांच शेजार्यांकडून 4 किलो माती घेऊन घरच्या घरी शाडूची मनमोहक अशी गणपती बाप्पाची मूर्ती तयार केली. यासाठी त्यांनी वॉटर, येलो, स्किन, ब्लॅक, गोल्ड, पिंक आदी नैसर्गिक रंगांचा वापर केला.
पाण्यात सहज बुडाली
शाडूच्या मातीपासून तयार केलेली ही गणेश मूर्ती नॅशनल पार्क येथील कृत्रिम तलावात बुडाल्यानंतर अवघ्या काही तासांत विरघळली. तिचे कोणतेही अवशेष तरंगताना आढळले नाहीत.
मुंबईत समुद्रातील पाण्याचे होणारे प्रदूषण लक्षात घेऊन इको-फ्रेंडली गणपती बाप्पाची मूर्ती तयार करण्याचे ठरविले होते. यासाठी आमच्या शेजारांनी 4 ते 5 किलो शाडूची माती दिली होती. त्यापासून मी दररोज थोडे-थोडे करत तीन आठवड्यांत एक फूट गणपती बाप्पाची मूर्ती बनविली.
निधी एस., श्रीगणेशभक्त

