मुंबई : सोळाजणांची फसवणूक करणार्‍या आरोपीला अटक

File Photo
File Photo

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांना गंडा घालणार्‍या एका हॉटेल व्यावसायिकाला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. सलमान याकूब घडिया असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. हॉटेल व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने सलमानने आतापर्यंत सोळा जणांची 1 कोटी 64 लाखांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

यातील तक्रारदार माहीम येथे राहत असून कूपर हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांची सलमानशी ओळख झाली होती. या ओळखीत त्याने जोगेश्वरीत एक हॉटेल चालविण्यासाठी घेतले होते. या व्यवसायासाठी त्याने त्यांच्याकडे गुंतवणुक करावी. या गुंतवणुकीवर तो त्यांना चांगले व्याजदर देईल, असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे वीस लाखांची गुंतवणूक केली होती. काही महिने त्याने त्यांना व्याजदराची रक्कम दिली, मात्र नंतर ही रक्कम देणे बंद केले. याच दरम्यान त्याने त्यांना चार लाख रुपये परत केले होते. मात्र व्याजदराची रक्कम देणे बंद केल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे उर्वरित पैशांची मागणी केली. मात्र त्याने त्यांना पैसे परत केले नाही.

चौकशीदरम्यान त्यांना सलमानने त्यांच्यासह इतर पंधराजणांकडून अशाच प्रकारे पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे समजले होते. या सर्वांकडून त्याने एक कोटी साठ लाख रुपये घेतले होते. मात्र कोणालाही पैसे परत न करता तो हॉटेल बंद करुन पळून गेला. हा प्रकार लक्षात येताच या सर्वांनी ओशिवरा पोलिसांत सलमानविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सलमानच्या अटकेचे आदेश ओशिवरा पोलिसांना दिले. या आदेशानंतर ओशिवरा पोलिसांच्या एका विशेष पथकाने पळून गेलेल्या सलमान घडिया याला काही तासांत अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

सलमानने अशाच प्रकारे इतर काही लोकांकडून पैसे घेतल्याचे तपासात उघडकीस आले असून फसवणुकीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्याकडून फसवणूक झालेल्या लोकांनी ओशिवरा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news