

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गोडधोड खाद्यपदार्थ बनवण्यासाठी सुकामेव्याचा जास्त वापर केला जातो. बाजारात सुकामेव्याला दसरा- दिवाळीत मागणी अधिक असते. यंदा जगभरात बहुतांश सुकामेव्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याने बहुतांश सुकामेव्याच्या दरात यंदा २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
बदाम, काजू, जर्दाळू, अक्रोड, मनुका याच्या भावात वाढ झाली आहे. मागील वर्षी काजू ५५० ते ८०० रूपये प्रतिकिलो भाव होता. यंदा मात्र काजू १ हजार ते १२०० रुपये प्रति किलो दर झाला आहे.
यंदा सुकामेव्याचे दर वाढल्याने सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला असल्याने लाडू मधील काजू, बदाम गायब झाल्याचे दिसत आहे. दिवाळीत सुकामेवा हा टिकाऊपणा असल्याने मागणी अधिक असते. यंदा मात्र प्रामुख्याने ड्रायफ्रूटसच्या किमती चांगल्याच वधारल्याने दिवाळी यंदा चांगलीच महाग होणार आहे.
परदेशातील सुकामेव्याच्या किंमतीत जवळपास ३० टक्क्यांनी दर वाढले आहेत. हा इराण-युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम असल्याचे सांगितले जाते. आफ्रिका, ब्राझील या देशातून येणारा काजू, अंजीर, बदाम, खजूर, बेदाणा दरात वाढ झाली आहे. पावसामुळे यंदा देशातील उत्पादन घटले असल्याने यंदा आवक कमी आहे.
त्याचा परिणाम सर्वच प्रकारच्या सुकामेव्यावर झाला आहे. मागील वर्षी दिवाळीत काजू सुमारे ८०० रूपये प्रतिकिलो दराने मिळत असल्याने सामान्यांच्या आवाक्यात होता. मात्र यंदा काजूचे दर १ हजाराचा टप्पा पार करत १२०० रूपयांवर पोहचला आहे. यामुळे काजू यंदा फराळाच्या पदार्थातून गायब होणार असल्याचे दिसत आहे. वाढत्या महागाईमुळे यंदा मात्र सामान्यांच्या आवाक्याबाहेर दिवाळी गेली आहे.