

मुंबई : ओला, उबेर रॅपिडो या तीनही कंपन्यांनी सहाय्यक परिवहन आयुक्त भरत कळस्कर यांचे आदेश धुडकावून लावत नवे दर निश्चितीबाबत कुठल्याही प्रकारे लेखी माहिती आयुक्तालयास कळवली नाही. त्यामुळे अॅप आधारित रिक्षा टॅक्सी चालकांचे उपोषण सुरूच राहणार आहे.
अॅप आधारित टॅक्सी - रिक्षा चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 15 जुलैपासून संप आणि आझाद मैदानात उपोषण सुरू केले होते. पाच दिवसांनंतर संप स्थगित केला. या संपाची झळ हातावर पोट असलेल्या अॅप आधारित या टॅक्सी-रिक्षा चालकांना बसली. शेवटी नाईलाजाने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला गेला. मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी बैठक होऊन सविस्तर चर्चा झाली.
ओला, उबर, रॅपिडो कंपनीचे अधिकारी, चालकांच्या संघटनेचे प्रतिनिधी यांच्यासह परिवहन विभागाचे सहाय्यक आयुक्त भरत कळसर बैठकीला उपस्थित होते. बैठकीत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चाही झाली. बुधवारी सर्व मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच पुढील भूमिका ठरवली जाईल, असे संपकर्यांच्या महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी जाहीर केले. मात्र तीनही कंपन्यांनी बुधवारी लेखी स्वरूपात नव्हे दर दिले नाहीत. त्यामुळे उद्या गुरुवारी पुन्हा या संदर्भात बैठक होणार आहे.