

मुंबई : मुंबईकरांसाठी सोयीची वाटणारी पण प्रत्यक्षात बेकायदेशीरपणे सुरू असलेली ओला आणि उबरची बाईक टॅक्सी सेवा अखेर बंद करण्यात आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः केलेल्या एका स्टिंग ऑपरेशनमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर, परिवहन विभागाने ही धडक कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी (दि.2) स्वतः एका सामान्य प्रवाशाप्रमाणे ॲपवरून बाईक बुक केली. या स्टिंग ऑपरेशनद्वारे त्यांनी या सेवेतील त्रुटी आणि बेकायदेशीर स्वरूप उघडकीस आणले. प्रवाशांच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होऊ नये आणि नियमांचे उल्लंघन थांबावे, या हेतूने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
या भांडाफोडानंतर परिवहन विभागाने तातडीने पावले उचलत सायबर पोलिसांशी संपर्क साधला आणि ओला व उबर या दोन्ही कंपन्यांना त्यांच्या ॲपवरून बाईक टॅक्सीचा पर्याय तात्काळ हटवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ही सेवा आता बंद झाली आहे.
ओला आणि उबरवर कारवाई झाली असली तरी, 'रॅपिडो' (Rapido) या लोकप्रिय ॲपवर मात्र बाईक टॅक्सी सेवा अजूनही सुरूच असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एकाच प्रकारच्या सेवेसाठी वेगवेगळ्या कंपन्यांना वेगवेगळे नियम लावले जात आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ओला आणि उबरवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता प्रशासनासमोर रॅपिडोचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे रॅपिडोची बेकायदेशीर सेवा कधी बंद होणार आणि सर्वच ॲप्स साठी एकच नियम कधी लागू होणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.